Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:44 PM2022-12-24T17:44:43+5:302022-12-24T17:46:15+5:30
पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला
कातरखटाव : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. हा अपघात भिगवण-सांगली मार्गावर खटाव तालुक्यातील बोंबाळे हद्दीत झाला. सुनीता हरिदास कुलकर्णी (वय ३२, रा. डांभेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, डांभेवाडी येथील हरिदास रामदास कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघे गोंदवलेहून दुचाकी (एमएच १४ सीझेड २७५१)ने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कातरखटावकडे येत होते. त्याचवेळी त्याच मार्गाने निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसली. यामध्ये पाठीमागील चाकाखाली सापडल्याने सुनीता कुलकर्णी या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरखाली महिला सापडल्याने ठार झाल्याची अपघातस्थळावरून माहिती मिळाली. या अपघाताची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत तक्रार, पंचनामा प्रक्रिया सुरू होती. सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख, हवालदार सविता वाघमारे तपास करीत आहेत.
विना नंबरप्लेटचे ट्रॅक्टर
भिगवण-सांगली रस्त्यावर अनेक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या, खड्डे वारंवार पडत असल्यामुळे नेहमी अपघात होत आहेत. कर्णकर्कश आवाजात वाहन चालवणे, अपघात झाला की पळून जाणे असा वाहतूक चालकांचा प्रकार दिसून येत आहे. याला वाहतूक पोलिसांनी चांगलीच समज देणे गरजेचे आहे.