मैत्रीण जखमी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: September 19, 2015 11:48 PM2015-09-19T23:48:17+5:302015-09-19T23:51:50+5:30
दुचाकी अपघातानंतर युवकाची नदीत उडी : कऱ्हाडातील घटना; दोघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू
कऱ्हाड : मैत्रिणीला सोडायला कॉलेजला जाताना महामार्गावर दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये मैत्रीण गंभीर जखमी झाली. या परिस्थितीत मैत्रीण जखमी झाल्याचे नैराश्य व नातेवाईक काय म्हणतील, या भीतीपोटी एका युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील सह्णाद्री रूग्णालयानजीक शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरे विभागातील एका वाडीमधील युवती उंब्रजच्या महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली.
रस्त्यावर आल्यानंतर तिला गावातीलच एक मित्र भेटला. संबंधित युवकाबरोबर ती दुचाकीवरून उंब्रजला जाण्यासाठी निघाली. दोघेही उंब्रजमध्ये पोलीस ठाण्यासमोर आले असताना दुचाकीला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिली. त्यामुळे युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटला.
दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात युवती रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरच पडली. तर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच रस्त्यावरुन निघालेले पादचारी, स्थानिक ग्रामस्थ तातडीने धावून आले. त्यांनी दोन्ही जखमींना बाजूला घेऊन उटवून बसविले. मात्र, दोघांनाही गंभीर इजा झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी दोघांनाही उपचारार्थ तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले. मात्र, युवती गंभीर जखमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही कऱ्हाडच्या सह्णाद्री रूग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिकेतून त्यांना ‘सह्णाद्री’मध्ये आणण्यात आले.
तेथील अतिदक्षता विभागात जखमी युवतीवर उपचार सुरू करण्यात आले तर युवक जखमी अवस्थेत बाहेरच थांबून होता. काही वेळानंतर संबंधित युवक रूग्णालयाच्या आवारातून बाहेर पडला. तो धावतच कोयना नदीच्या जुन्या पुलावर गेला. पुलावरून त्याने नदीपात्रात उडी घेतली.
दरम्यान, जुन्या पुलानजीक काहीजण मासेमारी करीत होते. युवकाने नदीपात्रात उडी घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर मासेमारी करणाऱ्यांनीही लगेच पात्रात उडी घेऊन त्या युवकाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला सह्णाद्री रूग्णालयात आणण्यात आले.
जखमी युवती व आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या युवकावर अद्यापही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी)
रक्तबंबाळ स्थितीत घेतली उडी
दुचाकी अपघातात युवकही जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्तही वाहत होते. अशा परिस्थितीतच तो युवक पुलाच्या दिशेने धावला. नागरिकांना काही समजण्यापूर्वीच त्याने पुलावरून खाली उडी घेतली. हा सर्व प्रकार काही नागरीकांनी प्रत्यक्ष पाहिला. मात्र, नेमका काय प्रकार आहे, हे कोणालाही उशिरापर्यंत समजले नाही.
ओळखपत्रावरून पटली ओळख
युवती जखमी व युवक बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे दोघांचीही ओळख पटविण्यात सुरूवातीला अडचणी आल्या. मात्र, युवतीकडे तिच्या महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडल्याने त्यांची ओळख पटली. पोलिसांनी घटनेची माहिती घरी कळविल्यानंतर त्या युवतीचे नातेवाईक रूग्णालयात आले.
मित्र पोहोचला रूग्णालयात
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर युवकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मोबाईलमध्ये असलेल्या क्रमांकावरून त्याच्या मित्रालाही रूग्णालयात बोलावून घेण्यात आले. मित्र रूग्णालयात आल्यानंतर त्याने त्या युवकाला विश्वासात घेत त्याच्याकडून सर्व माहिती घेतली. तसेच घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.