साताऱ्यात सोलापूरच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:48+5:302021-02-11T04:40:48+5:30
सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर ''मी मेडिकल करणार नाही. मला मरायचे आहे,'' असे सांगत एका ...
सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर ''मी मेडिकल करणार नाही. मला मरायचे आहे,'' असे सांगत एका सतरावर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या विद्यार्थिनीचे अपहरण झाले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दोनच दिवसांपूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित विद्यार्थिनी सोलापूर जिल्ह्यातील असून, ती सातारा येथील एका महाविद्यालयाच्या लेडिज हॉस्टेलमध्ये राहत आहे. दोन दिवसांपूर्वी तिला पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, संबंधित मुलगी आढळून आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणले आणि ती सापडली असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर संबंधित मुलीला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. येथे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी तिच्याकडून माहिती घेत होते. यावेळी तिच्या वडिलांना बोलावून आणा, असे म्हणत असतानाच तिने स्वत:च्या जवळ असणारी औषधाची बाटली काढली आणि त्याचे झाकण काढून त्यातील औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित डॉक्टर, कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखले असता ''मला मेडिकल करायचे नाही. मला मरायचे आहे,'' असे म्हणत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उज्वला कुंभार यांनी संबंधित मुलीच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.