आत्महत्या प्रकरण: नंदकुमार ननावरे यांची अनेक गुपिते वकिलांनी फोडली

By दीपक शिंदे | Published: August 23, 2023 02:03 PM2023-08-23T14:03:18+5:302023-08-23T14:03:58+5:30

अजूनही अनेकांची नावे समोर येणार

Suicide case: Nandkumar Nanavare many secrets revealed by lawyers | आत्महत्या प्रकरण: नंदकुमार ननावरे यांची अनेक गुपिते वकिलांनी फोडली

आत्महत्या प्रकरण: नंदकुमार ननावरे यांची अनेक गुपिते वकिलांनी फोडली

googlenewsNext

सातारा : उल्हासनगरमध्ये १ ऑगस्टला आत्महत्या केलेल्या नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने मृत्यूपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये आत्महत्येची अनेक कारणे सांगितली आहेत. त्यामध्ये वकिलांनी एकमेकांना माहिती देणे आणि विविध खटल्यातील गुपिते खुली केल्याचा आरोप केला आहे. वकिलांमुळेच आपल्यावर ही वेळ आली असून त्यांनी जगणे मुश्किल केल्याचा उद्वेगही या व्हिडीओमध्ये व्यक्त केला आहे.

नंदकुमार ननावरे हे उल्हासनगरच्या माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी याचे स्वीय सहायक होते. त्याबरोबरच त्यांनी पप्पू कलानी आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचीही मंत्रालयातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांना शासकीय कामे करण्याचा तसेच लोकांना अडचणीत मदत करण्याचा अनुभव होता. त्याच जोरावर त्यांची कलानी कुटुंबीयांशी जवळीक वाढली होती. हीच बाब अनेकांना खटकत असल्यामुळे त्यांना कलानी कुटुंबीयांपासून दूर करण्याचा कट रचण्यात आला.

अनेक गुन्ह्यांमध्ये असलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढणे, त्यांना जामीन मिळवून देणे आणि खटल्यांचा गुंता सोडविण्याचे काम नंदकुमार ननावरे करत होते. तर अशा लोकांना पुन्हा अडचणीत आणण्याचे काम कमलेश निकम करत असल्याचा आरोप भाजपच्या एका नेत्याने केला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कमलेश निकम यांच्याकडे जाण्याचा लोकांचा कल कमी झाला आणि ननावरे यांच्याकडची गर्दी वाढू लागली. ही वस्तुस्थिती अनेकांना पाहवली नाही. त्यामुळेच ननावरे यांना रितसर कट रचून अडकवण्याचा, त्यांच्यावर खोट्या केसेस लावण्याचा नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याचा आरोप ननावरे यांनी आपल्या व्हायरल व्हिडीओमध्ये केला आहे.

वकिलांनी हुशारी चांगल्या कामासाठी वापरण्याचे ननावरेंचे आवाहन

नंदकुमार ननावरे यांच्या खटल्यासंदर्भातील काम पाहणारे वकील आणि त्यांच्या विरोधातील लोकांचे वकील हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

भाऊ, चुलतभाऊ आणि पुतण्या असे त्यांचे नाते आहे. ज्ञानेश्वर देशमुख हे नंदकुमार ननावरे यांचे वकील होते. या सर्वांनी एकत्रित नियोजन करून खटले लवकर संपू नये तसेच कोणी काय बोलायचे, काय बोलायचे नाही हे पूर्णपणे ठरविले जात होते. अगदी नियोजन पद्धतीने वकिलांनी आपल्या हुशारीचा वापर करून ननावरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वकिलांनी आपली हुशारी लोकांना सावरण्यात वापरावी कुटुंबे उद्ध्वस्त करू नयेत असे आवाहनही ननावरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओमध्ये केले आहे.

अटकपूर्व जामीन घेणारा रणजितसिंह नाईक निंबाळकर कोण ?

नंदकुमार ननावरे प्रकरणामध्ये चार लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. २८ ऑगस्टपर्यंत हा जामीन घेतल्यामुळे त्यांना अटक करता येत नसल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये संग्राम निकाळजे, दोन वकील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश आहे. मात्र, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला याच्याशी काहीच संबंध नसून या नावाचे केवळ फलटणमध्येच १२ ते १३ लोक असून राज्यातील इतर लोकांची संख्या अधिक असू शकेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर नेमके कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रकरण मतदानावर आल्यावर झाली पळापळ

नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपले बोट कापून घेत असताना भाजप सरकारवर हल्लाबोल केला. मी भाजपला ज्या बोटाने मतदान केले ती माझी मोठी चूक झाली असून तो भाग मला माझ्या शरीरासोबत ठेवायचाच नाही. असे सांगत हे बोट त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, हीच गोष्ट भाजप सरकारच्या जिव्हारी लागल्यामुळे गेले २० दिवस थांबलेला तपास गतिमान झाला असून आतापर्यंत या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि गणपती कांबळे यांचा समावेश आहे.

Web Title: Suicide case: Nandkumar Nanavare many secrets revealed by lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.