साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:21 PM2019-09-19T16:21:17+5:302019-09-19T16:25:34+5:30
सातारा येथील बसाप्पा पेठत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारा : येथील बसाप्पा पेठेत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामचंद्र अग्रे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-उपळे या गावातील रहिवासी होते. गेल्या दोन वर्षांपासून ते साताऱ्यात कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. सेंट्रिंगचे काम मिळत नसल्याने ते सध्या घरीच असायचे. मंगळवारी रात्री दहा वाजता जेवण करून पत्नी व मुले झोपी गेली. त्यावेळी त्यांनी आतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नीला जाग आल्यानंतर पत्नीने खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र, आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेजारील लोक जमा झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी रामचंद्र अग्रे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. परंतु नेमक्या कोणत्या कारणातून त्यांनी आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. रामचंद्र अग्रे यांना एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार सुनील मोहरे हे अधिक तपास करत आहेत.