सातारा : एसटी वाहकाची बसस्थानकात आत्महत्या, फसवणूक झाल्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:30 PM2018-10-20T12:30:28+5:302018-10-20T12:32:24+5:30
पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
ढेबेवाडी : पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
तळमावले येथील रहिवासी असलेले नानासाहेब ताईगडे हे पाटण आगारात अनेक वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी पाटण-ढेबेवाडी ही मुक्कामी बस घेऊन आले होते. रात्री जेवण करून नानासाहेब आणि याच बसचे चालक रमेश पवार हे दोघेही एसटीमध्येच झोपले. याच बसस्थानकात पाटण आगाराची दुसरीही बस मुक्कामी होती.
त्या बसचे वाहक गजानन कचरे हे पहाटे तीनच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना बसस्थानकाच्या छताला कोणी तरी गळफास घेतल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ही माहिती अन्य सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर सर्वजण त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाहिला असता ते नानासाहेब ताईगडे असल्याचे निदर्शनास आले. चालक, वाहकांनी घटनेची माहिती माहिती पाटणच्या आगारप्रमुखांना दिली.
तसेच ढेबेवाडी पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र्र साळुंखे तपास करत आहेत.