कोरोना झाल्याच्या भीतीने मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:16+5:302021-04-14T04:36:16+5:30
गोविंद राम साहू (वय ३६, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. कार्वेनाका, कऱ्हाड), असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. घटनास्थळावरून ...
गोविंद राम साहू (वय ३६, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. कार्वेनाका, कऱ्हाड), असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील कार्वे नाक्यावर असलेल्या अपार्टमेंटच्या पाठीमागे काही झोपड्या आहेत. या शेडवजा झोपड्यांमध्ये परप्रांतीय मजूर कुटुंबासह वास्तव्य करतात. मूळचा छत्तीसगडचा असणारा गोविंद हासुद्धा येथील एका झोपडीत कुटुंबासह राहण्यास होता. त्याच्यासह कुटुंबातील इतर जण मजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबातील दोघांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर अहवाल बाधित प्राप्त झाला. संबंधित दोघांवरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गोविंदलाही सौम्य त्रास होत होता. त्यामुळे त्यालाही कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, तसेच त्याला चाचणी करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र, गोविंदने त्याकडे दुर्लक्ष केले. हलगर्जीपणा करीत त्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली. कोरोनाच्या भीतीमुळे उपचार घेत नसल्याचे तो काहींना म्हणाला होता. मात्र, दोन दिवसांपासून त्याला जास्त प्रमाणात ताप येऊ लागला. अनेकांनी त्याला कोरोनाची चाचणी करून बाधा झाली असल्यास उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कोरोनाची भीती वाटते, असे म्हणून तो उपचारासाठी जात नव्हता. अखेर याच भीतीपोटी मंगळवारी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी उघडकीस आली. त्यानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. कऱ्हाड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.