बालिकेला कवेत घेऊन मातेची पेटवून आत्महत्या
By admin | Published: September 11, 2015 12:41 AM2015-09-11T00:41:44+5:302015-09-11T00:44:05+5:30
विवाहिता मनोरुग्ण : देगाव फाट्याजवळील घटना
सातारा : पाच महिन्यांच्या मुलीला कवेत घेऊन मातेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहराजवळील देगाव फाट्यानजीक अहिरे कॉलनीत घडली. दुपारी दोन वाजता तिने वेडाच्या भरात हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
रशिदा मुन्ना खान (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, रिजवाना (वय पाच महिने) या चिमुरडीनेही या घटनेत प्राण गमावले. औद्योगिक वसाहतीजवळ देगाव फाटा येथील अहिरे कॉलनीत एका घराची खोली भाड्याने घेऊन खान कुटुंब वास्तव्यास आहे. मूळचे खटाव तालुक्यातील असलेले मुन्ना खान मजुरी करतात आणि पत्नी, मुलीसह येथे राहतात.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मुन्ना घरात नव्हते. त्यांच्या खोलीतून धूर येत असल्याचे कपडे वाळत घालणाऱ्या एका महिलेने पाहिले. या महिलेने आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. खोलीत पाहिले असता रशिदा यांनी पेटवून घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. मात्र, रुग्णवाहिका येईपर्यंत मायलेकींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती समजताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर सायंकाळी उशिरा मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी प्राथमिक तपास केला. (प्रतिनिधी)