जयगड येथे शिपायाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:29 PM2017-08-16T23:29:26+5:302017-08-16T23:29:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुख्याध्यापकांनी दुसºयांदा मेमो दिल्याच्या नैराश्येतून शिपायाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, जयगड येथे घडली. रवींद्र निवळकर (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र निवळकर (मूळ निवळी-बावनदी, सध्या जयगड) हे येथील माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. शाळेच्या स्वच्छतेबाबत मुख्याध्यापक वारंवार नापसंती व्यक्त करीत होते. त्यामुळे निवळकर यांना अस्वच्छतेबाबत यापूर्वी मेमो दिला होता. बुधवारी दुसरा मेमो दिला होता.
दुपारी दीडच्या सुमारास निवळकर यांच्यासह दुसरा शिपाईही शाळेत हजर होता. दुसरा शिपाई जेवणासाठी घरी गेला. त्यावेळी निवळकर यांनी कार्यालयाशेजारी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
याबाबतची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निवळकर यांना तातडीने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका निवळकर यांच्या पत्नीने घेतली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कार्यवाही सुरू होती.