वाईत पोलिसाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:53 PM2017-09-06T23:53:26+5:302017-09-06T23:53:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला दिग्विजय पोळ याची पत्नी सुप्रिया पोळ (वय २७, रा. कवठे, ता. वाई) हिने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी हवालदार दिग्विजय पोळला अटक केली असून, त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रियाचा विवाह कवठे, ता.वाई येथील दिग्विजय पोळ याच्याबरोबर दि. २२ मे २०१४ रोजी झाला होता. सुप्रियाचे शिक्षण बीएस्सी बीएडपर्यंत झाले होते. तसेच तिला पाच महिन्यांचा मुलगा आहे. तर सुप्रियाचा पती दिग्विजय पोळ हा सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तिचा गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता.
दरम्यान, सोमवार, दि. ४ रोजी रात्री पावणे दहा वाजता सुप्रियाच्या आईला फोन करून सुप्रिया चक्कर येऊन जिन्यावरून पडली असून, तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले असल्याचे खोटे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहिले असता सुप्रिया मयत झाल्याचे समजले. सुप्रियाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दवाखान्यातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर त्यांना सांगितले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात अत्यसंस्कार केले.
माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ
लग्नानंतर पती व सासरच्या लोकांनी सुप्रियाला दोनच महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर चारचाकी गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी सुप्रियाचा सतत छळ केला जात होता. सुप्रियाच्या माहेरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने प्रत्येकवेळी आई सुप्रियाची समजूत काढून तिला सासरी नांदण्यासाठी पाठवत असे. तसेच पती दारू पिऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करीत होता.
पती सासूविरोधात गुन्हा
याप्रकरणी पती दिग्विजय पोळ, सासू विजया नामदेव पोळ, दीर जयदीप नामदेव पोळ व चुलत सासरे किसन आनंदराव पोळ यांच्यावर भुर्इंज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.