कराड शहरात सूट; पण हायवेवर हेल्मेट सक्तीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:37 PM2017-10-11T15:37:22+5:302017-10-11T15:39:41+5:30
हेल्मेट सक्तीच्या कारणावरून मोठे वादंग झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने शहरातील सक्ती रद्द केली आहे. मात्र, महामार्गावर हेल्मेट बंधनकारक असून, दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. बुधवारीही पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर अनेक दुचाकीस्वारांवर कारवाई करून सुमारे पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला.
कराड,11 : हेल्मेट सक्तीच्या कारणावरून मोठे वादंग झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने शहरातील सक्ती रद्द केली आहे. मात्र, महामार्गावर हेल्मेट बंधनकारक असून, दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. बुधवारीही पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर अनेक दुचाकीस्वारांवर कारवाई करून सुमारे पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने आठवड्यातून दोन दिवस ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येते. या मोहिमेत वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून हजारो रुपये दंड वसूल करण्यात येतो. त्याचबरोबर परवाना नसलेल्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यास मदत होते.
दोन महिन्यांपूर्वी पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू केली. या सक्तीनंतर सुरुवातीचे काही दिवस चालकांचे प्रबोधन करण्यात आले. विनाहेल्मेट प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना अडवून पोलिस संबंधितास हेल्मेटबाबत समज देत होते. मात्र, काही कालावधीनंतर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.
या कारवाईमुळे अनेकांनी हेल्मेटविरोधात आवाज उठविला. महामार्गावर सक्ती करा. मात्र, शहरात हेल्मेटसक्ती नको, अशी मागणी सामान्यांसह लोकप्रतिनिधींकडूनही झाली. अखेर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील हेल्मेटसक्ती मागे घेत फक्त महामार्गावर हेल्मेटसक्ती असेल, असे महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.
गत महिनाभरापासून महामार्गावर हेल्मेटची सक्ती लागू आहे. मात्र, बहुतांश चालक अद्यापही महामार्गावर हेल्मेटचा वापर करीत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाईची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
कराड शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिसांचे पथक महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून अशा प्रकारची कारवाईची मोहीम राबवित आहे. बुधवारीही पोलिसांनी वनवासमाची गावच्या हद्दीत मोहीम राबवून दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.