उन्हाचा पारा वाढला, सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे चार रुग्ण
By दीपक शिंदे | Published: April 19, 2023 03:54 PM2023-04-19T15:54:51+5:302023-04-19T15:55:30+5:30
नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले
सातारा : एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानात प्रचंड वाढ झाली असून, यामुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचा पारा वारंवार ३९ ते ४० वर राहत आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमान वाढत गेले. आता ४० वर पारा असून, यामुळे नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे उष्माघाताचे रुग्णही वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हामुळे अनेकांना भोवळ येत आहे. तर काहींना श्वाच्छोस्वास घेण्यास त्रास होत आहे. अशा चार रुग्णांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अनेक रुग्ण उष्माघाताच्या त्रासामुळे तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येत आहेत. शक्यतो दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत घराबाहेर पडू नये. वाढत्या उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.