राज्यभरातील पर्यटकांना सुंदरगडाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 06:19 PM2020-11-30T18:19:28+5:302020-11-30T18:23:38+5:30
fort, sataranews, tourisam दिवाळी सुटीच्या हंगामात पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक गडावरील निसर्ग सानिध्यात होणारा सूर्यास्त पाहूनच गडावरून खाली उतरत आहेत. तालुक्यात निसर्ग पर्यटनासोबत ऐतिहासिक महत्त्व असणारा सुंदरगडही नवीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे.
प्रवीण जाधव
रामापूर : दिवाळी सुटीच्या हंगामात पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक गडावरील निसर्ग सानिध्यात होणारा सूर्यास्त पाहूनच गडावरून खाली उतरत आहेत. तालुक्यात निसर्ग पर्यटनासोबत ऐतिहासिक महत्त्व असणारा सुंदरगडही नवीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे.
पाटण येथून जवळच असलेला सुंदरगड सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. कऱ्हाड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरून पाटण शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या सुंदरगडाकडे जाता येते. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरणारा पर्यटक आणि कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येणारा पर्यटक हा आवर्जुन सुंदरगडाकडे वळत आहे. येथे येऊन सुंदरगडाच्या सुंदरतेत तो मोहून जात आहे.
गडावर आल्यावर पश्चिम महाद्वारात दर्शनी वीर हनुमान आणि दक्षिणाभिमुख गणपती आहे. सूर्योदय होत असताना किरणे गणपती मूर्तीवर येतात. तर सूर्यास्त होताना सूर्यकिरण वीर हनुमान मूर्तीवर येते. हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
काळ्या कातळात खोदलेली भव्य तलवार आकाराची विहीर येथील दुसरे महत्त्वाचे आकर्षण आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर ह्यगजलक्ष्मीह्ण कोरलेली आहे. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी ही गजलक्ष्मी तलवार विहीर सुंदरगडाचे आकर्षण आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, वसंतगड, गुणवंतगड या किल्ल्यांचे सहज दर्शन सुंदरगडावरून होते. येथून दिसणारा लालबुंद सूर्यास्त पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. सुंदरगडावर आलेला पर्यटक गडाची संपूर्ण सफर पूर्ण करूनच पर्यटनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे.
अभ्यासकही होतायत आकर्षित
पाटणमधील दुर्गप्रेमींकडून गडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या गडाच्या बाजूला अनेक वनौषधींची झाडे असून, दुर्गप्रेमींकडून अनेक झाडांची लागवडही करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वनौषधींचे अभ्यासकही गडाकडे आकर्षित होत आहेत.
युवकच बनलेत गाईड
पाटण तालुक्यातील या सुंदरगडाविषयी माहिती सांगण्यासाठी तालुक्यातीलच युवक गाईड म्हणून काम करीत आहेत. आपल्या विशेष शैलीत ते पर्यटकांसमोर गडाचा इतिहास उभा करत आहेत. त्यामुळे गडावर आलेला पर्यटक आनंदित होऊन परतत आहे.