सूर्यकांतचा खून रस्त्यावर डोके आपटून!
By admin | Published: March 25, 2015 11:30 PM2015-03-25T23:30:18+5:302015-03-26T00:02:13+5:30
पैलवानाला अटक : तडवळेतील प्रकरणाला कौटुंबिक वादाची किनार
कोरेगाव : तडवळे संमत कोरेगाव येथील सूर्यकांत जगदाळे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याच गावातील पै. अशोक बाजीराव झांजुर्णे (वय ४५) याला बुधवारी सायंकाळी अटक केली. या खुनाला कौटुंबिक वादाची किनार असून, झांजुर्णे याने सूर्यकांतचे डोके रस्त्यावर आपटून खून केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कोरेगाव येथे चौकशी केली. गोळेवाडी येथे धोम डाव्या कालव्यामध्ये सोमवारी (दि. २३) सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर्यकांत बाळकृष्ण जगदाळे (वय ४५, रा. तडवळे संमत कोरेगाव) याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला होता. त्याच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला होता. तपासात पै. झांजुर्णे याचा संदर्भ समोर आल्यावर त्याच्यावर तपास केंद्रित झाला आणि अखेर त्याला अटक झाली.सूर्यकांत जगदाळे आणि त्याची पत्नी विजया यांचा २००५ मध्ये घटस्फोट झाला होता. मात्र, २००२ सालापासून पै. अशोक झांजुर्णे हा विजया व तिची आई जानकाबाई कुर्लेकर ऊर्फ जिजी यांचा सांभाळ करत होता. त्यातून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. २००७ मध्ये सूर्यकांतने पै. झांजुर्णे याच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे वादावादी वाढली होती. सूर्यकांतच्या वर्तवणुकीमुळे पै. झांजुर्णे याचे मानसिक संतुलन ढासळले होते. दरम्यानच्या काळात पै. झांजुर्णे याने त्याला ‘आता भांडणे संपवून टाकूया. पुन्हा भांडणे करायची नाहीत ’ असेही सांगितले होते. मात्र, शुक्रवारी (दि. २०) झालेल्या तडवळेच्या यात्रेत सूर्यकांतने मद्यपान केले होते. पै. झांजुर्णे यानेही मद्यपान केले होते. रात्री दीडच्या सुमारास सूर्यकांत रस्त्यावर धडपडत असताना पै. झांजुर्णे याने त्याला पाहिले व त्यास ‘घरी जाऊन झोप,’ असे समजावले; मात्र त्याने शिवीगाळ केल्याने वादावादी झाली. त्यातून पै. झांजुर्णे याने सूर्यकांतला रस्त्यावर ढकलले. तोंडावर पडल्याने पै. झांजुर्णे याने घाबरून त्याचे डोके दोन वेळा आपटले. फरफटत त्याच्याच घराजवळ टाकले. पटक्याने त्याचे हात-पाय बांधले. पोत्यात बांधण्याचा प्रयत्न केला. नंतर दुचाकीला बांधून धोम कालव्यामध्ये त्याला फेकले. (प्रतिनिधी)
अखेर दिली कबुली
सूर्यकांत जगदाळे विविध गुन्ह्यांमधील संशयित असल्याने त्या दृष्टीनेही तपास केला जात होता. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे देखरेख करत होते. मंगळवारी त्यांनी सूर्यकांतच्या घराची पाहणी केली. तेथे गुन्ह्यातील वस्तू आढळल्यानंतर उपअधीक्षक मधुकर गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी तडवळे येथे लक्ष केंद्रित केले. पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली व माहिती जमा केली. त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे चौकशी केल्यानंतर पै. झांजुर्णे याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखविला तरी ‘तो मी नव्हेच,’ अशी भूमिका तो घेत होता. बुधवारी मात्र त्याने खुनाची कबुली दिली.