भाजीविक्रेत्याची मुलगी बनली ‘सुपर गर्ल’ : खेलो इंडियात सुवर्णपदक -चमकते तारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:40 PM2019-02-08T23:40:02+5:302019-02-08T23:40:30+5:30
जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या तरी मनात ध्येय आणि जिद्द बाळगणाऱ्यांना निश्चित यश मिळते. अशीच किमया साताºयातील वेटलिफ्टर वैष्णवी पवार हिने करून दाखवली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत
स्वप्नील शिंदे।
सातारा : जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या तरी मनात ध्येय आणि जिद्द बाळगणाऱ्यांना निश्चित यश मिळते. अशीच किमया साताºयातील वेटलिफ्टर वैष्णवी पवार हिने करून दाखवली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भाजीविक्रेत्याची मुलगी खºया अर्थाने ‘सुपर गर्ल’ बनली आहे.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षीय ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने चमकदार कामगिरी केली. तिने मिळवलेले यश हे सहज वाटत असले तरी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास साधा सरळ नव्हता. त्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
वैष्णवीचे वडील साताºयात भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर घरचा उदरनिर्वाह चालवितानाही मुलीच्या वाट्याला हलाखीचे जीवन येऊ नये, यासाठी आई-वडिलांनी धडपड सुरू केली. त्यांनी आपली मुलगी वैष्णवीला अनंत इंग्लिश मीडियम स्कूल घातले. शाळेत शिक्षक असताना ती विविध स्पर्धेत सहभागी होत होती. तिची खेळातील चुणूक पाहून क्रीडा शिक्षक जितेंद्र देवकर यांनी तिला वेटलिफ्टिंगमध्ये खेळणार का, असा प्रश्न विचारला. सुरुवातीला काय करावे, हे समजत नव्हते. तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. क्रीडा शिक्षकांनी आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले.
वैष्णवी इयत्ता पाचवीत असताना वेटलिफ्टिंग खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने बाजी मारली. हळूहळू ती एक-एक स्पर्धा जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली. खेळामध्ये यश मिळत असताना वैष्णवीसाठी आहार आणि इतर खर्च जास्त असल्याने आई-वडिलांनी तिच्या गरजा मर्यादित करून तिच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. तिनेही त्याची जाणीव ठेवत खेळात १०० टक्के यश मिळवण्याचा निर्धार केला.
दोन महिन्यांपूर्वी आसाम, गुहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यातून तिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली.
सुरुवातीला वैष्णवी पवार व मयुरी देवरे या दोन्ही खेळाडूंचे पालक मुलींना वेटलिफ्टिंग खेळण्यासाठी पाठविण्यास तयार नव्हते. त्यांना खेळाबद्दल सांगून त्यांचे मत परिवर्तन केले. त्यानंतर त्या दोघींकडून पहिल्या दिवसापासून सातत्याने मेहनत करून घेतली. त्यांना पहिल्यापासून मैदानात रडायचे नाही, लढायचे, हाच मंत्र देत आल्याने त्यांनी त्याचे सार्थक केले.
-जितेंद्र देवकर, क्रीडा प्रशिक्षक