सुपर स्ट्रक्चर स्टॉल उभारणीस प्रारंभ
By admin | Published: January 3, 2016 12:45 AM2016-01-03T00:45:44+5:302016-01-03T00:49:06+5:30
तयारी अंतिम टप्प्यात : ७ जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ही शेतकऱ्यांची यात्रा म्हणून सर्व प्रसिद्ध आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ११ जानेवारी या कालावधीत पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे सुपर स्ट्रक्चर स्टॉल उभारणीस श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, बापूराव जाधव, रुपेश कोळेकर, कट्टे आदी उपस्थित होते.
सुरेश जाधव म्हणाले, ‘या प्रदर्शनात मुख्यत: कोरडवाहू शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने शेती व शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग, कुक्कटपालन, मत्स्य व्यवसायासोबतच कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, शेतमाल प्रक्रिया आदींवर विशेष भर देण्यात येणार आहे. यंदाच्या कृषी प्रदर्शनात नवनवीन तंत्रज्ञान, खते, औषधे, अवजार, यंत्रसामूग्रीसह इतर नामांकित कंपन्याचे सुमारे तीनशे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. शेतीचा बदलता चेहरा, यांत्रिकीकरण, पीक पद्धतीतील नवनवे बदल, खत आणि पाणी व्यवस्थापनातील बदल, ऋतुमानानुसार निर्माण झालेली आव्हाने, शेती मालाची बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग या सर्व क्षेत्रांचे अंतरंग उलगडून दाखविणारे कृषी प्रदर्शन असेल. जगभरातील बदल आणि जिल्ह्यातील शेतीच्या स्थितीची अभ्यास करून विविध कंपन्या शेतकऱ्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात, शेतीसमोरील समस्यांची माहिती शेतकरी तज्ज्ञासमोर मांडतो, त्यांच्याकडून उत्तर मिळवतो आणि शेतात जाऊन प्रयोग करतो. युवक प्रयोगशील शेतात करिअर करू पाहत आहेत. त्यांच्यासाठी प्रदर्शन एक पर्वणीच असेल. शेती विकासाच्या वाटेवर प्रदर्शन मार्गदर्शकाची भूमिका बजावते. त्यांच्यात कंपनीचा सहभाग म्हणजे लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधीच आहे. त्यासाठी या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)