गावाची अंधश्रद्धा वेशीवर टांगली; स्वागत कमानीवर चक्क काळी बाहुली लावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:51 PM2021-10-04T17:51:09+5:302021-10-04T17:51:49+5:30
साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत.
>> सचिन काकडे
सातारा : सातारा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या मातीत जन्मलेल्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या हयातीत अंधश्रद्धेला कायमच मूठमाती दिली. इतके करूनही लोकांच्या मनावर आरूढ झालेले अंधश्रद्धेचे भूत अजूनही उतरलेले नाही. सातारा तालुक्यातील दरे गावच्या स्वागत कमानीवर लटकविण्यात आलेल्या काळ्या बाहुलीने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत. येथील ग्रामस्थ व आजी- माजी सैनिक संघटनेकडून गावात २०२० रोजी भव्यदिव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली. कमानीवर असलेला राष्ट्रध्वज, बंदूकधारी सैनिक, बळीराजाचा सोबती असलेल्या बैलाची प्रतिकृती सारे काही लक्ष वेधून घेते. मात्र, याच कमानीवर राष्ट्रध्वजाच्या खालोखाल काळी बाहुली बांधून काही ग्रामस्थांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.
केवळ नजर लागू नये, या उद्देशाने काही ग्रामस्थांकडून स्वागत कमानीवर ही बाहुली बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खरोखरच काळी बाहुली लावून एखाद्या वस्तूचे संरक्षण होते का? हे समजण्याइतपत कोणीही अडाणी नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या मातीत सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आज जगभर पोहोचली. मात्र, आधुनिक युगातही अशा प्रकारची कृत्ये समाजातील काही विघातक घटकांकडून होत आहेत, यावर विश्वास बसत नाही. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार बंद व्हावेत यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पुन्हा एकदा मरगळ झटकावी लागणार आहे.
थोडा विचार कराच...
पोगरवाडीतून आरे गावात स्थायिक झालेले कर्नल संतोष महाडिक यांना कूपवाडा येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्या स्मृती आजही आरे, दरे, पोगरवाडी येथील ग्रामस्थांच्या मनात कायम आहेत. त्यांचा वारसा जपणाऱ्या दरे ग्रामस्थांकडून अशा प्रकारच्या कृत्याला पाठबळ देणे योग्य नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास ३५० किल्ले बांधले. मात्र, त्यांनी किल्ल्यावर अशा बाहुल्या कधीच बांधल्या नाहीत. त्यामुळे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? याचा दरे ग्रामस्थच नव्हे तर गाड्या, घर, कमानी व झाडांवर काळ्या बाहुल्या बांधणाऱ्या प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.
हे तर केवळ आत्मिक समाधान
एखाद्याने नवीन गाडी घेतली की, गाडीला लिंबू-मिरचीचे तोरण लटकवले जाते. काळी बाहुली अन् छोटी चप्पल असल्याशिवाय नव्या घराची पूजा होत नाही. पूजेनंतर या वस्तू घराच्या दर्शनी भागावर लटकवल्या जातात. बऱ्याचदा झाडाला लिंबू, टाचण्या व काळ्या बाहुल्या बांधल्या जातात. हा प्रकार अघोरी असून, यातून केवळ भोंदूबाबांचे पोट भरते. हे माहीत असूनही आपण अशा प्रकारांना खतपाणी घालत आहोत. खरोखरच अशा गोष्टींचा लाभ कितपत होतो, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, काळ्या बाहुल्या बांधून होतेय ते केवळ आपले आत्मिक समाधान.