संगणक परिचालकांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा
By admin | Published: November 17, 2014 10:54 PM2014-11-17T22:54:12+5:302014-11-17T23:26:50+5:30
आज पंकजा मुंडेंशी चर्चा : ...अन्यथा शनिवारी आझाद मैदानावर मोर्चा
सातारा : ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला अनेक संघटना व मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या मागण्यासंदर्भात मंगळवार, दि. १८ रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. यावेळी निर्णय न झाल्यास दि. २२ रोजी आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांनी पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीत संगणकावर दाखले देणे बंद झाले आहे. लोकांना दाखले काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम बंद करणाऱ्या परिचालकांनी सोमवारी प्रत्येक पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण, पाटण, कोरेगाव, वाई, मेढा, फलटण येथील पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मेढा : येथील आंदोलनात जावळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झाले होते. परिचालकांच्या मागण्यांना मनसेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
दहिवडी : माण पंचायतीसमोरील आंदोलनाला पंचायत समितीचे उपसभापती अतुल जाधव, पंचायत समिती सदस्य हुलगे, माजी उपसभापती दादासाहेब शिंगाडे, वंजारी युवक संघटना, परिवर्तन सामाजिक संस्था, ग्रामपंचायत संघ यांनी पाठिंबा दिला.
वाई : तालुक्यातील संगणक परिचालकांनी मोर्चा काढून पंचायत समितीसमोर आंदोलन केले. यावेळी स्वप्निल सणस, महेश भणगे, स्वप्निल शेलार, दीपक जाधव, रूपेश कांबळे, सागर बाबर, मंगेश चौधरी, सूरज जगताप, आरती जाधव, रेश्मा मांढरे, श्रीराम पोतदार आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आज शिष्टमंडळ मुंबईत...
दि. १८ रोजी मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संघटनेचे सात जणांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या चर्चेत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष मुंबईत दाखल होणार आहेत. दि. २२ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.