सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

By admin | Published: March 29, 2015 11:17 PM2015-03-29T23:17:11+5:302015-03-30T00:16:20+5:30

ग्रामस्थांची मागणी : पराक्रमाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न

Suraj Mohiten's memorial will be organized | सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

Next

कुडाळ : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जावळी तालुक्यातील सरताळे (गणेशवाडी) येथील वीर जवान सूरज मोहिते यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी सरताळे येथे व्हावे, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहेत. सूरज मोहिते हे देशासाठी धारातीर्थ पडले असून, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास सतत जागृत ठेवण्यासाठी जावळी तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्मारकाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सरताळे ग्रामस्थांनी केले आहे. हुतात्मा मोहिते यांचा जन्म जावळी तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी अवघी तीस ते चाळीस घरे व जेमतेम १५० लोकसंख्या असलेल्या गणेशवाडी येथे झाला असून, त्यांचे बालपण गणेशवाडी, सरताळे येथेच झाले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी येथे झाले आहे. बालपणी ते नित्यनेमाने वैराटगडावर दर्शनाला जात असायचे. गावच्या डोंगरदऱ्यात निसर्गरम्य वातावरणात बागडत असताना शिक्षणाचे धडे गिरवताना मोहिते यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली.
२० मार्च २०१३ मध्ये ते सैन्यदलात दाखल झाले. नोकरी लागताना मोहिते यांनी जी कागदपत्रे सादर केली ती सुद्धा जावळी तालुक्यातीलच आहेत.गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी सूरज माहिते हे हुतात्मा झाले. गावच्या सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गुड्या न उभारता सणच साजरा केला नाही.
सूरज मोहिते यांनी देशासाठी आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ््या निडरपणे झेलून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवले, म्हणून या भारतमातेच्या थोर सुपुत्रास मरणोत्तर वीर पुरस्कार देऊन सन्मानित करावे, तसेच हुतात्मा सूरज, त्यांची वीरमाता, गणेशवाडी ग्रामस्थांना योग्य न्याय मिळून हीच खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे, अशी मागणी गणेशवाडी (सरताळे) ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी सरताळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सरताळेची यात्रा साधेपणाने
सरताळे (गणेशवाडी)च्या ग्रामदैवतांची वार्षिक यात्रा गुरूवार दि. १६ ते १८ एप्रिलला होणार आहे. याही यात्रेत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम न करता केवळ साधेपणाने धार्मिक विधी करून साजरी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजही सूरज आपल्यात नाही, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नसून ग्रामस्थांचा शोक अजूनही टिकून आहे. सुरज यांच्या आठवणीने आजूनही गावात युवा वर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्या शौर्याची चर्चा करताना दिसत आहेत.

Web Title: Suraj Mohiten's memorial will be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.