वाहनांच्या कंपनाने झुलतोय सुरूरचा उड्डाणपूल

By admin | Published: March 10, 2017 10:55 PM2017-03-10T22:55:46+5:302017-03-10T22:55:46+5:30

तात्पुरती मलमपट्टी : नऊ महिन्यांनंतरही परिस्थिती ‘जैसे-थे’; वाहनचालकांतून संताप

Surat flyover in Jhalotali by automobile companies | वाहनांच्या कंपनाने झुलतोय सुरूरचा उड्डाणपूल

वाहनांच्या कंपनाने झुलतोय सुरूरचा उड्डाणपूल

Next

कवठे : सुरूर, ता. वाई येथील उड्डाणपुलाला ५ जून २०१६ रोजी भगदाड पडले व पुलाचा कमकुवत भाग हादरू लागला. विशेष म्हणजे बांधकाम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा पूल अंदाजे तीन महिनेच सुरू होता व लगेचच पुलास भगदाड पडले. सध्या या ठिकाणाहून वाहतूक बंद ठेवण्यात आली असली तरी ज्या ठिकाणी खड्डा पडला आहे, त्या भागाची नऊ महिने झाले तरी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वाहनांच्या कंपनाने या पुलाला हादरे बसत आहेत.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. सुरूर येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असले तरी या उड्डाणपुलामुुळे समस्याही उद्भवल्या आहेत. वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर या पुलाला गेल्या वर्षी ५ जून रोजी भगदाड पडले. याबाबतचे वृत्त दि. ६ जून २०१६ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुलावरील खड्डा तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करण्यात आला. पुन्हा वाहतूक सुरू केल्यानंतर पुलाचा खचलेला भाग हादरू लागला व त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात डांबराचे पिंप लावून खचलेल्या भागावरून वाहतूक बंद करण्यात आली.
आज जवळजवळ या घटनेला नऊ महिने इतका कालावधी उलटला तरी या कामाबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नसून आजसुद्धा पुलाच्या या खचलेल्या भागावर उभे राहिले असता शेजारून अवजड वाहन गेल्यास संपूर्ण पूल हादरत आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे इशारे दिले तरीसुद्धा महामार्ग प्राधिकरण कोणतीही कारवाई करीत
नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)



डांबरी पिंप ठरताहेत अपघाताचे कारण
दुहेरी वाहतुकीने निम्मा उड्डाणपूल चढून आल्यावर अचानक समोर मोठा खड्डा दिसतो. डांबरी पिंप पाहून वाहनधारकांची फसगत होते. वाहन वळवताना डाव्या बाजूच्या वाहनचालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. डांबरी पिंपास वाहन धडकून अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे. पुलाच्या बंद भागामध्ये मातीचे ढीग, अपघातग्रस्त वाहनांच्या काचा व तुटलेले भाग विखुरलेले आहेत.

पुलाखालून जाताना नागरिकांना पुलाच्या निकृष्ट कामामुळे भीती वाटत असून, पुलावरून प्रवास करताना भरधाव वेग व अचानक तीन लेनचे निम्म्याच लेनमध्ये रूपांतर
झाल्याने दुचाकी व लहान वाहने अपघातग्रस्त होत आहेत. किरकोळ स्वरूपाचे अपघात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कोणाकडे, हा प्रश्न आहे.
- राजेश चव्हाण, वकील,
सुरूर, ता. वाई


उड्डाणपुलावर ज्या ठिकाणी भाग खचला आहे त्या ठिकाणी पुलाच्या खालच्या बाजूला लोखंडी बॉक्स व पोत्यांची बारदाने वापरून पुलाखालचा भाग दुरुस्त करून बंदिस्त केला आहे. पुलास हादरे बसत असल्याने पुलाखाली कोणतीही वाहने लावली जाऊ नयेत किंवा पादचाऱ्यांनी या भागातून जाताना अपघात होऊ नये यासाठी काळजी घेतल्याचे जाणवते.

Web Title: Surat flyover in Jhalotali by automobile companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.