सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Published: February 23, 2016 12:41 AM2016-02-23T00:41:53+5:302016-02-23T00:41:53+5:30

न्यायालयाचा निकाल : महापालिकेवर केलेली दगडफेक भोवली

Suresh Awati's corporator cancels | सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द

सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द

Next

सांगली : स्थायी समिती माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविल्याचा निकाल सोमवारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर बी. एस. गारे यांनी दिला. २००८ मधील मोर्चावेळी महापालिकेवर केलेल्या दगडफेकीत आवटी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती नसताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्याविरोधात प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील व मिरजेतील मतदार सलीम शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आवटी विजयी झाले होते. आवटी यांना मिरज कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी २०११ मध्ये मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कुणीही त्यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ते निवडणुकीस पात्र ठरले. त्यानंतर निवडूनही आले. छाननीवेळी त्यांच्या शिक्षेला स्थगिती नव्हती. त्यामुळे याच मुद्द्यावर या प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील यांनी याचिका दाखल केली होती.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शिक्षेची माहिती लपविण्यात आली आहे. मिरज न्यायालयाने नैतिक अध:पतन झाल्याचे ताशेरे ओढत, आवटी यांच्यासह अन्य काही लोकांना शिक्षा सुनावली होती. निकालपत्रात आवटी व इतर महापालिकेचे नगरसेवक विश्वस्त असताना, त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले, ते नैतिक अध:पतनच असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र महापालिका कायदा कलम १० (१) अ नुसार न्यायालयाने नैतिक अध:पतनाखाली एखाद्याला शिक्षा सुनावली असेल, तर त्याला निवडणूक लढविता येत नाही, ते निवडणुकीसाठी अपात्र ठरतात, अशी तरतूद आहे. त्याचे दाखले न्यायालयात सादर करण्यात आले. मैनुद्दीन बागवान यांच्याप्रकरणी झालेल्या निकालाचाही दाखला देण्यात आला.
आवटी यांनी शिक्षेनंतर येथील जिल्हा न्यायालयात अपील केले होते. त्यावेळी शिक्षेला स्थगितीची मागणी केली नव्हती. त्यांची शिक्षा निलंबित ठरविण्यात आली होती. त्यामुळे छाननीवेळी ते अपात्रच होते, हा मुद्दा याचिकाकर्त्यांचे वकील एस. एस. शेठ यांनी मांडला. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे छाननीवेळच्या परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने हा निकाल दिला. त्याविरोधात जिल्हा न्यायालयातच आवटी यांनी स्थगितीची मागणी करून अपिलात जाण्यासाठी मुदतीची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी या मागणीवर आक्षेप नोंदविला आहे.
तांत्रिक मुद्दा चर्चेत
महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार नैतिक अध:पतनाच्या मुद्द्याखाली सहा वर्षे संबंधितास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात आता आवटी यांच्या अपात्रतेची मुदत कोणत्या तारखेपासून धरली जाणार, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा एक तांत्रिक वादाचा मुद्दा ठरू शकतो.
तीन नगरसेवक अपात्र
गेल्या तीन महिन्यांत नगरसेवक अपात्र ठरण्याच्या तीन घटना घडल्या. यामध्ये माजी महापौर राष्ट्रवादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान, काँग्रेस नगरसेविका आयेशा नायकवडी आणि आता सुरेश आवटी यांचा यामध्ये समावेश आहे. आवटी व बागवान यांची प्रकरणे जवळपास एकच आहेत. नायकवडी यांच्या अपात्रतेचा संबंध जातीच्या दाखल्यासंदर्भात होता.

Web Title: Suresh Awati's corporator cancels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.