प्रस्थापितांच्या विरोधात लाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:44 PM2017-10-17T23:44:38+5:302017-10-17T23:44:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तालुक्यात गाव पातळीवर सत्तांतराची लाट आल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीतून स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाºया गटांमध्येच धुमश्चक्री झाली. अनेक गावांत सत्तांतर झाले. खासदार व आमदारांना मानणाºया दुसºया गटांकडेच या ग्रामपंचायतींचे नेतृत्व आले आहे.
सातारा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. मंगळवारी येथील भूविकास बँकेच्या सभागृहात तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या देखरेखीखाली मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या केंद्रावर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच मतदान केंद्राबाहेर असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह संचारत होता. गुलालाच्या उधळणीत विजेत्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या क्षेत्रमाहुली, देगाव, वडूथ, आरळे, म्हसवे, अपशिंगे मिल्ट्री, मालगाव या गावांत धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. देगावात सत्ताधाºयांविरोधात जनतेने निकाल दिल्याने देगाव विकास आघाडीच्या सर्वसमावेश आघाडीचा विजय झाला. सत्ताधाºयांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विजया राजे या एकमेव महिला उमेदवार या ठिकाणी सत्ताधाºयांच्या बाजूच्या निवडून आल्या आहेत. देगाव विकास आघाडीतर्फे सरपंचपदाचे उमेदवार गणेश रोकडे यांनी तब्बल २ हजार ३०७ मते मिळवून विजय मिळविला. प्रकाश फडतरे, राणी पवार, धनंजय महामुनी, पोर्णिमा साळुंखे, सुरेखा साळुंखे, प्रमोद भोसले, जगन्नाथ साळुंखे, विमल यादव, योगेश साळुंखे, सीताबाई साळुंखे या सर्वपक्षीय देगाव विकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.
क्षेत्रमाहुलीत आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाºया भैरवनाथ अजिंक्य पॅनेलने सत्ताधारी माजी पंचायत समिती सदस्य संतोषभाऊ जाधव व अमर जाधव यांच्या क्षेत्रपाल जोगेश्वरी पॅनेलचा ८-६ असा पराभव केला. या ठिकाणी माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे यांना पराभवाचा धक्का बसला. भैरवनाथ अजिंक्य पॅनेलतर्फे नीलेश जाधव हे सरपंचपदावर निवडून आले. याच पॅनेलचे चंद्रकांत पवार, शालन भोसले, नारायण जाधव, दीपाली गुरव, प्रकाश सावंत, अजित देवकर, रुपाली पवार हे आठ सदस्य निवडून आले. तर सत्ताधारी क्षेत्रपाल जोगेश्वरी पॅनेलचे संकेत निकम, अश्विनी पवार, मोहिनी घाडगे, शुभांगी रसाळ, रुपाली आढाव, सचिन आढाव हे सहा उमेदवार निवडून आले आहेत. या ठिकाणी सत्तांतर होऊन भैरवनाथ अजिंक्य पॅनेलने सत्ता ताब्यात घेतली आहे.
वडूथ ग्रामपंचायतीत रयत पॅनेलने ८ जागा पटकावत सत्तांतर घडवून आणले. सत्ताधारी अजिंक्य पॅनेलला ४ जागा मिळाल्या. सरपंचपदी किशोर शिंदे निवडून आले. तर नारायण साबळे, शोभा गोरे, सुवर्णा निकम, संतोष कांबळे, शिरीष शेंडे, संगीता जगताप, छाया गोरे हे रयत पॅनेलचे सात तर छबू मोरे, अर्चना साबळे, अभिजित साबळे, गणेश साबळे हे अजिंक्य पॅनेलचे चार सदस्य निवडून आले आहेत.
म्हसवे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीमधीलच दोन गटांत लढत झाली. बाळसिद्धनाथ अजिंक्य पॅनेलने सरपंचपदासह ७ जागा पटकावल्या. या पॅनेलतर्फे संजय शेलार सरपंचपदी निवडून आले. नीलेश शेलार, छाया शेलार, छाया सोनमळे, मनीषा शेलार, विनोद राठोड, शशिकांत कांबळे हे सदस्य सत्ताधाºयांच्या वतीने तर रासाई पॅनेलतर्फे शुभांगी दीक्षित, सुनील शेलार, सुजाता लेंबे हे निवडून आले आहेत.
मालगावात अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी संचालक व वाहतूक संस्थेचे विद्यमान संचालक सुरेश कदम तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य दयानंद उघडे यांच्या अजिंक्य पॅनेलचा माजी पंचायत समिती सदस्या उज्ज्वला कदम यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने धुव्वा उडविला. सरपंचपदी विलास कदम हे निवडून आले. अजिंक्य पॅनेलचे नऊ सदस्य निवडून आले. तर अजिंक्य पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
देगावात कांचन साळुंखे गटाला धक्का
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला. सागर साळुंखे, रवी घाडगे, नेताजी ननावरे यांच्या ताब्यात देगावची ग्रामपंचायत होती, परंतु देगाव विकास आघाडी या सर्वपक्षीय पॅनेलने ही सत्ता हिसकावून घेतली आहे. या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांना मानणाºया गटाची सत्ता आली आहे.
म्हसवे सरपंचांचा ३ मतांनी विजय
म्हसवेत तर काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अवघ्या तीन मतांनी संजय शेलार यांनी विजय खेचून आणला.
आरळेत काँगे्रसला हात
आरळे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या सत्तेला किसन वीर साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब कदम यांनी सुरुंग लावला. त्यांच्या नेतृत्वाखालील काँगे्रसच्या वडजाई परिवर्तन पॅनेलने राष्ट्रवादीच्या ग्रामविकास पॅनेलचा ६-४ असा पराभव केला. शोभा किरण कदम या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
चिठ्ठीने दोघींना तारले...
अपशिंगेत सुमन मोरे व संगीता निकम यांना समान मते पडली. चिठ्ठी टाकून निकम यांना विजयी घोषित केले. असाच प्रकार सोनगाव तर्फ सातारा या ग्रामपंचायतीबाबतही झाला. प्रभावती मुळीक व सुवर्णा जाधव यांना सारखीच मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. यात प्रभावती मुळीक विजयी ठरल्या.