आश्चर्य : चक्क दगड मारल्याने वाचला महिलेचा जीव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:17 PM2019-07-27T12:17:39+5:302019-07-27T12:19:27+5:30
झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले.
सातारा : झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले.
याबाबात अधिक माहिती अशी, अजिंक्यताऱ्यावर सायंकाळच्या सुमारास अनेकजण फिरण्यासाठी जातात. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातील पाच ते सहाजणांचा ग्रुप चालत अजिंक्यताऱ्यावर निघाला होता. त्यावेळी एका ओढ्यामधील झाडाला साडी बांधून संबंधित महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती. त्या महिलेने गळ्याला साडी गुंडाळली होती.
या प्रकार एका ज्येष्ठ नागरिकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आणखी चार ते पाचजणांनी मोठ- मोठ्याने आरडाओरड सुरू केली. तरी सुद्धा संबंधित महिला ओढ्यामध्ये स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे नागरिकांनी हातात दगड घेऊन महिलेच्या दिशेने भिरकावले.
भयभीत झालेल्या महिलेने अखेर गळ्याभोवती गुंडाळलेली साडी कशीबशी सोडून तेथून पळ काढला. संबंधित महिला विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे आम्ही तिचा शोध घेण्यासाठी पुढे गेलो नाही, असे एका ज्येष्ठ नागरिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.