कोरोनाने घेरले.. मोफत धान्याने तारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:24+5:302021-05-26T04:39:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न पडला. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने दिलेल्या मोफत धान्याने गोरगरिबांना तारले आहे. जिल्ह्यातील १६ लाख ७६ हजार ६१६ लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने देखील तसा निर्णय घेतला असल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब जनतेच्या हाताला काम राहिलेले नाही. मजुरी थांबली तसा पैसा येणे बंद झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे जमणार नसल्याने गरीब जनता चिंतेत होती. या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय संजीवनी ठरलेला आहे.
जिल्ह्यात मे महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रतिकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५ हजार ८२७ मेट्रिक टन गहू व ३ हजार ६९२ मेट्रिक टन तांदूळ मोफत वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये अन्नधान्य याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रति सदस्य ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिमा पाच किलोप्रमाणे मे महिन्याकरिता मोफत ४७२२ मेट्रिक टन गहू व २८७८ मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध झाला आहे. त्याचे वितरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
दरम्यान, जून महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रति कार्ड २५ किलो गहू व दहा किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिमानसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५२२२ मेट्रिक टन गहू व रुपये दोन किलो दोन रुपये प्रति किलो या दराने, तर ३ हजार ३९५ मेट्रिक टन तांदूळ ३ रुपये प्रति किलो या दराने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत असलेल्या लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना सदस्य तीन किलो गहू दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रति किलोप्रमाणे जून महिन्याकरिता मोफत ५ हजार ४२७ मेट्रिक टन गहू व ३६१८ मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील लाभ लाभार्थी २८२१०
प्राधान्य कुटुंब लाभार्थी १६७६६१६
कोट..
केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गहू, तांदूळ या वस्तू मिळत आहेत. जिल्ह्यातील कुठलेही कुटुंब या लाभापासून वंचित राहणार नाही.
- स्नेहा किसवे - देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी