पावसानं घेरलं... आता भुकेनं मारलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:03+5:302021-07-30T04:41:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘पावसानं आमच्या गावात तांडव घातलं. हक्काचा निवारा जमीनदोस्त झाला. उदरनिर्वाहाचं साधन असलेली शेती आता ...

Surrounded by rain ... now starving! | पावसानं घेरलं... आता भुकेनं मारलं !

पावसानं घेरलं... आता भुकेनं मारलं !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘पावसानं आमच्या गावात तांडव घातलं. हक्काचा निवारा जमीनदोस्त झाला. उदरनिर्वाहाचं साधन असलेली शेती आता नावापुरतीच उरलीय. दरडी कोसळल्यानं रस्ते बंद झालेत. आजारी माणसाला दवाखान्यात नेता येईना. त्यांचे हाल आम्हाला बघवेना. साठवणुकीतलं धान्य संपल्यानं पुढं खायचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. पावसानं घेरलं असताना आता भूक आम्हाला मारु लागलीय,’ अशा भावना महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

महाबळेश्वर सर्वाधिक पर्जन्यमान आलेला तालुका असून, गेल्या आठवड्यात या तालुक्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सव्वाशे वर्षांत झाला नाही इतका पाऊस दोन दिवसांत पडला. या पावसाने डोंगरी भागातील गावांची अक्षरश: वाताहत झाली. ओढे, नदीला आलेल्या पुरात गावांचे प्रचंड नुकसान झाले. शेती वाहून गेली, अनेक संसार उघड्यावर पडले. रस्ते खचल्याने, दरडी पडल्याने वाडा कुंभरोशी भागातील जवळपास ३५ गावांचे दळणवळण ठप्प आहे. येथील अंतोष सूर्यवंशी यांनी या भागातील ग्रामस्थांच्या व्यथा ‘लोकमत’कडे मांडल्या.

ते म्हणाले, ‘आजपर्यंत या भागात असा पाऊस कधीच झाला नाही. शेतकऱ्यांचं पोट भरणारी शेती पावसानं हिरावून नेली. जवळपास दीडशे हेक्टर शेती पावसात उद्ध्वस्त झाली. प्रतापगड, पार, पोलादपूर व महाबळेश्वर या गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे खचले. ठिकठिकाणी दरड कोसळल्याने दळणवळण ठप्प आहे. लोकांकडे पाच-सहा दिवस पुरेल एवढा किराणा होता. तो ही आता संपला आहे. त्यामुळे इथून पुढे खायचं काय? असा प्रश्न ३५ गावांमधील लोकांपुढे उभा ठाकला आहे. शासनाकडून अद्याप आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. किंबहुना तसा प्रयत्नही होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचं जगणं मुश्किल होऊन बसलंय. आजपर्यंत आम्ही अनेक संकटांचा सामना केला आणि त्यातून उभारीदेखील घेतली; पण या पावसानं आमचा कणाच मोडून टाकलाय. शासनाने वेळेत अन्नधान्य व आरोग्य सेवा पुरवल्या तरच ३५ गावांमधील लोकांना संकटातून उभारी मिळेल. शासनाने आमच्या व्यथा जाणून घेऊन आम्हाला मदत करावी.

(चौकट)

आम्ही दवाखान्यात जायचं तरी कसं

ताप, थंडी, खोकला असे किरकोळ आजार आम्ही अंगावर काढू शकतो; पण आमच्या घरातील, गावातील गंभीर आजार असलेल्या लोकांचं करायचं काय? घाटमार्ग बंद आहेत. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेता येईना. वाडा कुंभरोशी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथील औषधसाठाही आता कमी होऊ लागलाय. आजारी व्यक्तीला बघत बसण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

(चौकट)

आमच्या मनात कायमच असते भीती...

डोंगरउतारावर वसलेलं दरे हे जवळपास ७० घरांचं गाव. येथील ग्रामस्थ नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरत असतात. गेल्या आठवड्यात गावाच्या वरील बाजूला मोठी दरड कोसळली अन् ग्रामस्थांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ‘आमच्या मनात काहीतरी विपरीत घडेल, याची भीती कायमच असते; पण आमच्या पुढे कोणताही पर्याय नाही. आम्ही जाणार तरी कुठे?’ असे दरे येथील वनिता गायकवाड यांनी सांगितले.

(कोट)

प्रतापगडावरून वाहत आलेल्या पाण्यामुळे आमची शेती वाहून गेली. शेतीच्या जागी आता दगडांचा खच साचलाय. आमचं जगण्याचं प्रमुख साधनच आता नष्ट झालं आहे. आता शासनानेच आम्हाला योग्य ती मदत करावी.

- अमोल ढेबे, वाढा कुंभरोशी

(कोट)

घरात पाच-सात दिवस पुरेल एवढं धान्य होतं. आता ते संपलं आहे. रस्ते बंद असल्याने काहीच मिळेना. इथून पुढं पोट भरायचं तरी कसं, हा प्रश्न पडलाय. शासनाने आम्हाला धान्य उपलब्ध करुन दिल्यास किमान आमच्या पोटाचा प्रश्न मिटेल.

- अशोक धामुंसे, दुधोशी

(कोट)

आमच्या घरांचे, शेतीचे पावसाने प्रचंड नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची परवड सुरू आहे. एकमेकांना नुसतं धीर देऊन काय उपयोग. शासनाकडून आम्हाला अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही.

- नंदा मोरे, हारोशी

(चौकट)

अतिवृष्टीने हे झालं

- ३५ गावे, १२०० कुुटुंब तर ५००० ग्रामस्थांना फटका

- दीडशे हेक्टर शेती उद्ध्वस्त

- विहिरी बुजल्या

- आंबेनळी, प्रतापगड, चिखली येथील रस्ते खचले

- दरडी कोसळल्या, पूल वाहून गेले

- सोळशी नदीला आलेल्या पुरात घरांची पडझड

(चौकट)

या गावांना अतिवृष्टीचा फटका

दरे, जावळी, हरोशी, वाडा कुंभरोशी, प्रतापगड, दुधोशी, पार, कुमठे, कोंढोशी, गोगलवडी, शिरवली, बिरणमी, बिरवाडी, हातलोट, घोनसपूर, चर्तुुबेट, दुधगाव, झांजवड, देवळी, येरणे, चिखली.

(चौकट)

सव्वाशे वर्षांत सर्वाधिक पाऊस

- महाबळेश्वर तालुक्यात दि. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसाने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले. गेल्या सव्वाशे वर्षांत झाला नाही, असा पाऊस केवळ दोनच दिवसात झाला.

- हवामान विभागाकडे १८९६पासूनच्या पावसाच्या नोंदी आढळून येतात. दि. २२ जुलै रोजी ४८० तर २३ जुलैला ५९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या सव्वाशे वर्षांत २४ तासांत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

- महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा १९ जुलैपासून केवळ दहा दिवसात सुमारे २,३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

- ७ जुलै १९७७ रोजी महाबळेश्वरात चोवीस तासांत ४३९.८, ३१ जुलै २०१४ रोजी ४३२ तर १६ जुलै २०१८ रोजी २९८.७ मिलिमीटर पाऊस झाला होता.

Web Title: Surrounded by rain ... now starving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.