उत्तरमांड नदीला जलपर्णीने घेरले
By admin | Published: November 18, 2014 09:01 PM2014-11-18T21:01:59+5:302014-11-18T23:34:13+5:30
चाफळमधील स्थिती : अनेक ठिकाणी पाणी साठल्याने धोका
चाफळ : येथील राम मंदिराच्या दक्षिणेकडील ऐतिहासिक घाटावरून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीला जलपर्णीने वेढा घातला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
महाराष्ट्रकवी यशवंत तथा य. दि. पेंढारकर यांनी या उत्तरमांड नदीवर चिरकाल टिकणारे काव्य करून संपूर्ण महाराष्ट्रभर या नदीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या उत्तरमांड नदीचा श्वास सध्या या जलपर्णीच्या विळख्याने अक्षरश: गुदमरला आहे. पश्चिमेच्या उंच डोंगरकपारीतून उगम पावलेल्या या नदीचे यापूर्वी विशाल रूप होते. या नदीवर पुरातन ब्रिटिशकालीन असलेला ३५ फुटी उंचीचा पादचारी पूल आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजूस गावात सध्या ये-जा करण्यास ७ फूट उंचीचा दुसरा फरशी पूल आहे. यावरूनच सध्या रहदारी सुरु असते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीवरच कृष्णा खोरे महामंडळाने गमेवाडीनजीक उत्तरमांड मध्यम प्रकल्प उभारला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सध्या कमी झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राम मंदिरास तीथक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. मंदिर व परिसरात सुशोभीकरणाची अनेक कामे मार्र्गी लावली. पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून उत्तरमांड नदीच्या दोन्ही बाजूस सुसज्ज घाट बांधण्याचे काम प्रस्तावित होते. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन ती आता आमदार शंभुराज देसाई गटाकडे गेली आहे. विद्यमान सदस्यांनी प्रस्तावित घाट बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
नदीपात्राच्या दोन्ही बाजूला गारवेल व इतर जलपर्णीनी वेढा घातला आहे. पाण्याचा खळखळाट सध्या बंद झाल्याने पाण्याचा दुर्गंधीयुक्त साठा झाला आहे. त्यातच ग्रामस्थ, व्यावसायिक केर-कचऱ्यासह प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू नदीपात्रात टाकत असल्याने पाणी दूषित बनत चालले आहे. नदीपात्रालगतच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत गेल्यास ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चाफळच्या राम देवस्थान क्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी दोन कोटी रूपयांचा निधी मंदिर ट्रस्टला दिला जातो. उत्तरमांड नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यायला हवा. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून ट्रस्टने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावेत.
- अंकुश जमदाडे, उपसरपंच, चाफळ