मावळत्या सूर्या, लाडक्या कविवर्या... निरोप तुज देता!

By admin | Published: January 1, 2016 10:28 PM2016-01-01T22:28:26+5:302016-01-02T08:28:58+5:30

उत्साहाला गहिवर : नववर्षाचं स्वागत करताना कानाकानात, मनामनात रुंजी घालत राहिली मंगेश पाडगावकरांची जीवनगाणी

Surviving sun, cute poetry ... give tidings to you! | मावळत्या सूर्या, लाडक्या कविवर्या... निरोप तुज देता!

मावळत्या सूर्या, लाडक्या कविवर्या... निरोप तुज देता!

Next

राजीव मुळये --सातारासंवेदनशील मनाचा जीवनासक्त कोनाडा प्रकाशमान करणारी पणती दोन वर्षांच्या संगमापाशी विझून गेली आणि काळजाचा ठोका चुकला. मृत्यू अटळ, वयसुलभ तरी न झेपणारा; न सोसणारा. एखाद्या लाडक्याच्या जाण्यानं घायाळ झालेल्या काळजांवर फुंकर घालायला पूर्वी ‘आकाशवाणी’ हेच एकमेव माध्यम होतं. त्या जमान्यापासून अनेक पिढ्यांच्या बोटाला धरून ज्यानं चालायला शिकवलं, त्या कलंदराच्या मृत्यूमुळं आज सोशल मीडियाही जेव्हा जखमी होतो, तेव्हा जाणवतं... काळाचं बंधन नसलेल्या शब्दांचा निर्माता काळाच्या पडद्याआड जाण्यानं प्रत्यक्ष काळही थबकतो.
‘अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी’ अशा शब्दांत जीवनाचं मूल्य ज्यांनी आम्हाला सांगितलं, त्या कविवर्य मंगेश पाडगावकरांनी तीस डिसेंबरला इहलोकीची यात्रा संपवली, तेव्हा नववर्षाचं स्वागत करण्याचा मूड होता. व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुकनेही मावळतीचा गुलाबी रंग धारण करून स्वप्नरंजन सुरू केलं होतं. नववर्षाच्या ‘अ‍ॅडव्हान्स’ शुभेच्छा देणाऱ्यांनी नवीकोरी डिझाइन्स पाठवायला सुरुवातही केली होती. सातारकरांचे अनेक ग्रुप्स कास की ठोसेघर, कण्हेर की उरमोडी, अशा नियोजनात गुंतले होते. पोटापाण्यासाठी पुण्या-मुंबईत स्थायिक झालेले सातारकर तरुण स्थानिक मित्रांना ‘मी येतोय बरं का,’ असं सांगत होते... आणि अचानक सगळं थांबलं!
नववर्षाचा पहिला किरण पाडगावकरांच्या त्या चिरपरिचित जाड भिंगांच्या चष्म्यावर पडणारच नाही, या कल्पनेनं समाजमन आणि त्यामुळं समाजमाध्यमंंही कोमेजून गेली.
तीस तारखेला सकाळपासूनच पाडगावकरांच्या गाण्यांचे आॅडिओ शेअर केले जाऊ लागले. भल्या सकाळी ‘नीज माझ्या नंदलाला...’ ही अंगाई पाडगावकरांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ऐकताना अनेकांना कसनुसं झालं. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ ऐकताना, तब्बल ८६ वर्षे पाहून डोळे मिटलेल्या या कवीच्या जाण्याने ‘अर्ध्यावरती डाव मोडल्या’ची जाणीव होणं हीच त्याची थोरवी! सगळ्यांचं ‘सेम’ असणारं प्रेम कुणाची बोटं झरझरा टाइप करू लागली, तर कुणाच्या की-पॅडवर उतरू लागला मुखोद््गत असलेला पाडगावकरी ‘सलाम’.
या विस्तीर्ण काव्यपटाला उजाळा दिल्यानंतरच सोशल मीडिया नववर्षाच्या स्वागताकडे वळला.... नाइलाजानं; कारण काळ थांबणार नव्हता. कॅलेंडर बदलावंच लागणार होतं. सोशल मीडियावरून दृकश्राव्य आणि शाब्दिक शुभेच्छा इतक्या भरभरून वाहिल्या की, कॅलेंडर बदललं तरी खिळा तोच राहिलाय हेही लक्षात येऊ नये!


नमुनेदार कोकणी शुभेच्छा
गेल्या वर्सात हातून काय बरा वाईट झाला असात ता पोटात घाल. ह्या सर्व लेकरा बाळांका येणारा वरीस सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाऊ दे रे महाराजा. जी काय बाहेरची भुतुरची इडा पीडा असात तिचा वाटोळा कर व लेकरा बाळांका सुखी ठेव रे महाराजा!

Web Title: Surviving sun, cute poetry ... give tidings to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.