महाबळेश्वरमध्ये तीन महिन्यांनी सूर्यदर्शन; आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:10 PM2023-08-30T13:10:45+5:302023-08-30T13:11:04+5:30
महाबळेश्वरसह तालुक्यात तीन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू होती
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील पाऊस पाच हजारी पार झाला असून, द्विशतकास अवघे दोन इंच कमी आहेत. महाबळेश्वर तालुक्याचा मंगळवारी आठवडी बाजार असतो. महाबळेश्वरात मंगळवारी सकाळपासून तब्बल तीन महिन्यांनंतर सूर्यदर्शन झाले. त्यामुळे आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावखेड्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.
महाबळेश्वरसह तालुक्यात तीन महिन्यांपासून संततधार सुरू होती. त्यानंतर पावसाने सकाळपासून विश्रांती घेतल्यानंतर महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठ परिसरात पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत होती. वेण्णालेक परिसरात भरगच्च असे भरलेले वेण्णा नदीपात्रात वेण्णा लेक येथे नौकाविहार करण्यासाठी पर्यटकाची हजेरी पाहायला मिळत होती. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये बहुतेक पर्यटक खरेदी करताना शाल, स्वेटर, कानटोपी घालून फिरत होते. तर काहींनी गरम कपडे खरेदी करण्याचा आनंद घेतला.
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध केट्स पॉइंट, किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, लिंगमळा धबधबा ही पर्यटनस्थळावर पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत. चप्पल, चणे, जाम, जेली, येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट खरेदी करत बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे देखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.