साताऱ्यात सूर्यनारायण तापले अन् जमिनी उष्णता फेकतीय
By admin | Published: April 1, 2017 06:24 PM2017-04-01T18:24:10+5:302017-04-01T18:24:10+5:30
घामाच्या धारा : पावसामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ
आॅनलाईन लोकमत
सातारा : गेली पंधरा दिवस कडक उन्हामुळे कासाविस झालेल्या सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील जनतेला शुक्रवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. शनिवारी सकाळपासून जमिनीतून उष्णता फेकली जात असल्याने ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. शेतात झाडाच्या सावलीला बसले तरी झळा बसत आहेत.
साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे तापमान गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढले आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसचा पल्लाही पाऱ्याने ओलांडला होता. त्यामुळे वैशाख वणव्याची आठवण झाली होती. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातून विविध शासकीय कामानिमित्ताने साताऱ्यात आलेल्या लोकांना वारंवार थंड पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे रसवंतीगृह, आईस्क्रीम दुकाने गदीर्ने भरत आहेत.
दुष्काळी खटाव, कोरेगाव, पुसेगाव, सातारा आदी भागात शनिवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लहानांपासून मोठ्यांनीही घेतला; पण दुसरा दिवस शनिवारचा उकाडा असह्य होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच कडक ऊन पडले होते. आधीच तापलेल्या धरतीवर शुक्रवारी पाऊस पडल्याने धरती शनिवारी उष्णता बाहेर फेकत होती. त्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.
लहान मुलांना त्रासदायक
असह्य उन्हाळा लहान मुले, तान्हुल्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. घरात ठेवले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे तापाने फणफणण्याचे प्रमाण वाढले आहे.