सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसला संपविणारेच एक दिवस संपतील...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:38 PM2018-12-16T23:38:04+5:302018-12-16T23:38:53+5:30
वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत ...
वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत नाहीत. उलट घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, ही खेदाची बाब आहे. ज्या काँग्रेसने अतुलनीय त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ती संपविण्याची भाषा करणारेच एक दिवस संपून जातील. पंडित नेहरू, महात्मा गांधी, किसन वीर यांच्या समाजवादी विचारांची माहिती आज तरुण पिढीला होणे गरजेचे आहे,’ असे उद्गार माजी केंद्र्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
वाई येथे आयोजित कार्यक्रमास डॉ. शैलेंद्र वीर संपादित क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी उद्योग राज्यमंत्री विनायक पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पतंगराव फाळके, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, कवठेचे सरपंच श्रीकांत वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा, सांगली जिल्हा स्वातंत्र्यवीर घडविणारी फॅक्टरी होते. प्रतीसरकार स्थापन करून इंग्रजांना आव्हान देणारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनच देशात ओळखला जातो. स्वातंत्र्याचा इतिहासही अलीकडच्या काळातील पिढी विसरायला लागली आहे. त्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे अजूनही संशोधन होणे गरजेचे आहे. आबांचे चरित्र नेहमीच नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करीत राहील. डॉ. शैलेश वीर यांनी द्वितीय आवृत्ती काढून मोठे काम केले आहे.’
यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी मनोगतात आबासाहेब वीर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. प्रास्ताविकात डॉ. शैलेंद्र वीर यांनी आबासाहेब वीर यांचा लहानपणापासूनचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडून आबांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेंद्र वीर, अॅड. संजय खडसरे, अल्पना यादव, सुनील करडे यांनी स्वागत केले. डॉ. जितेंद्र्र वीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजया भोसले, मोहनआबा भोसले, शंकरराव पवार, डॉ. जे. बी. जमदाडे, नामदेवराव शिंदे, बापूसाहेब शिंदे, संदीप पोळ, अरुण पवार, प्रताप देशमुख, केशवराव पाडळे, विजयसिंह नायकवडी, आनंदराव लोळे, प्रदीप जायगुडे, विजया वीर आदींसह नागरिकउपस्थित होते.