आदित्य ठाकरे दूर, अगोदर निष्ठावंतांशी दोन हात करा, सुषमा अंधारेंचे मंत्री शंभूराज देसाईंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:40 PM2023-02-13T15:40:11+5:302023-02-13T15:41:19+5:30
देसाई यांच्याशी माझे भांडण हे वैयक्तिक नाही ते लोकहिताचे
राजेंद्र लोंढे
मल्हारपेठ : ‘पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यापेक्षा अगोदर पाटणमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निष्ठावंतांशी दोन हात करावेत,’ असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.
मल्हारपेठ, ता. पाटण येथे महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. अंधारे पुढे म्हणाल्या, ‘शंभूराज देसाई हे आपल्या आजोबांच्या विचाराच्या विरोधात काम करत आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारही कधी कळला नाही. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले. हे दोन मोठ्या माणसांतील भांडण होते. यामध्ये शंभूराज देसाई यांनी पडण्याचे काहीच कारण नव्हते.
शंभूराज देसाई हे दोन वेळा मंत्री आणि तीन वेळा आमदार ज्यांच्यामुळे झाले, अशा लोकांच्या विरोधातही बोलतात असे सांगून अंधारे पुढे म्हणाल्या, देसाई यांच्याशी माझे भांडण हे वैयक्तिक नाही ते लोकहिताचे आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांनी येथेच त्यांच्यासाठी सभा घेतली होती, म्हणून ते निवडून आले. आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यासाठी कोण सभा घेणार हा विषय आहे.
भाजपबरोबर ते गेले. भाजपने ईडीचा गैरवापर सुरू केला आहे. आतापर्यंत भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडी लागली. पण, ते भाजपबरोबर गेल्यानंतर ईडीची चाैकशी थांबली. सतत महागाई वाढविणाऱ्या या सरकारला जाब विचारण्याची आवश्यकता आहे. कारण, सातबारा उतारा बघून दोन हजार रुपये दिले जातात. धान्याच्या नावाखाली पैसे देणार आहेत. त्याचबरोबर गहू आणि तांदूळ लोकांना दिला जातो. तो जनावरेही खाणार नाहीत, अशा पद्धतीचा आहे. यामुळे लोकांनाच आता याचा विचार खऱ्या अर्थाने करावा लागणार आहे.