वडूज पोलिसांकडून संशयिताला कोठडीत मारहाण - :नातेवाइकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:48 PM2019-08-17T20:48:38+5:302019-08-17T20:49:02+5:30
विकासची आई व त्याची पत्नी खासगी रुग्णालयात गेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याची तब्येत खूपच गंभीर होत चालली आहे
वडूज : सावकारीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक केलेल्या विकास शामराव जाधव (वय २१, रा. वडूज, ता. खटाव) याला वडूज पोलिसांनी कोठडीतच अमानुषपणे मारहाण केल्याची तक्रार नातेवाइकांनी उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, विकास ऊर्फ बकाशा शामराव जाधव याला वडूज पोलिसांनी सावकारकीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून बुधवार, दि. १४ रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवार, दि. १५ रोजी विकास याला वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील, हवालदार खाडे व लोखंडे हे त्याला घरी घेऊन आले व घराची झडती घेतली. परत गेल्यानंतर त्यांनी विकासची तब्बेत बिघडली असल्याचे घरच्यांना सांगितले. विकासची आई व त्याची पत्नी खासगी रुग्णालयात गेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याची तब्येत खूपच गंभीर होत चालली आहे. त्याला सातारा येथे घेऊन जावा, असा सल्ला दिला. त्यामुळे त्याला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, विकासचा भाऊ विजय जाधव याने सांगितले की, पोलीस ठाण्यात असताना त्यांनी विकासच्या छातीत व पाठीत बुक्क्या मारल्या. त्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी विकासला बंदूक लावून मोबाईलवर रेकॉर्ड करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यासमोर त्यांना शिव्या देण्यास सांगून त्या शिव्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. विकासला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या गुप्तांगाला धरून शारीरिक त्रास दिला.
मोक्का लावण्याची धमकी!
‘पाच लाख रुपयांच्या सावकारीची केस आहे, तू आम्हाला तीन लाख रुपये दे, पैसे दिले नाही तर तुम्हा दोघा भावांना ‘मोक्का’ लावेन,’ अशीही पोलिसांनी धमकी दिल्याचे विजय जाधव याने तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित घटनेबाबत नातेवाइकांकडून तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत योग्य त्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठांकडे हा तक्रारी अर्ज प्रत्यक्ष पोलीस कर्मचारी घेऊन रवाना करण्यात आला आहे.
-अनिल वडनेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी