संशयपिशाच्चाने गिळले घर!
By Admin | Published: March 11, 2015 10:53 PM2015-03-11T22:53:00+5:302015-03-12T00:03:39+5:30
फिर्यादीतून डोकावले सत्य : आरे येथील दाम्पत्यामधील बेबनावाचे दोन लहान जीवांना चटके
राजीव मुळये -सातारा -पती-पत्नीमधील विश्वासाचे नाते संपून संशयाचे पिशाच्च मानगुटीवर बसल्यास अल्पावधीत घर होत्याचे नव्हते होऊ शकते आणि निष्पाप जीवांना त्याचे चटके सोसावे लागतात, हे वास्तव सातारा तालुक्यातील आरे गावात घडलेल्या भीषण घटनेविषयी दाखल झालेल्या फिर्यादीतून डोकावले आहे. आईवर अंत्यसंस्कार होत असताना पिता रुग्णालयात मृत्यूशी झुंजत असल्याचे दोन लहानग्या मुलींना पाहावे लागले आहे. दरम्यान, पत्नीने यापूर्वीही एकदा मृत्यू कवटाळण्याचा प्रयत्न केला होता, असेही फिर्यादीतून समोर आले आहे.
आरे (ता. सातारा) येथील रोहिणी संजय महाडिक या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिचा पती संजय वसंत महाडिक याने स्वत:चा गळा चिरून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती. रोहिणीचा भाऊ विजयकुमार रघुनाथ बर्गे (वय ३८, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) याने आपल्या बहिणीचा छळ होत होता, अशी फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. रोहिणीचा पती तिच्या चारित्र्याचा संशय घेत होता, तर तिच्या सासूला ‘वंशाचा दिवा’ हवा होता म्हणून ती तिला सतत टाकून बोलत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी रोहिणीने तणनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याची पोलिसात नोंद झाली नव्हती, असे नमूद करून विजयकुमार बर्गे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, ‘लग्नानंतर दोन वर्षे रोहिणीला चांगली नांदविली. मात्र नंतर चारित्र्यावर संशय घेऊन संजय तिला वारंवार मारहाण करू लागला.
डिसेंबरमध्ये रोहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि माझी धाकटी बहीण उमा यांनी संजयची भेट घेऊन ‘रोहिणीवर संशय घेऊ नका, तिला चांगली सांभाळा,’ अशी विनंती केली होती. परंतु संशय डोक्यातून न गेल्याने वारंवार संजय मला फोन करून म्हणायचा, की ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घे व त्या व्यक्तीला ठार मार.’ रोहिणीकडे यासंदर्भात विचारणा केली असता तसा प्रकार अजिबात नसल्याचे तिने सांगितले होते. पतीच आपला संशय घेऊन मारहाण करतो, मानसिक त्रास देतो, सासूही दोन मुलीच झाल्याने टोचून बोलते, असे रोहिणीने सांगितले होते.
दरम्यान, सोमवार, दि. ९ मार्च रोजी संजयच्या नंबरवरून मला फोन आला आणि त्याने मला रोहिणीशी बोलायला सांगितले. तिने मला आरे येथे येऊन भेटण्यास सांगितले. मी दुपारी तीन वाजता गेलो तेव्हा तिच्या डाव्या हाताला कोपरापासून मनगटापर्यंत प्लास्टर दिसले. चौकशी केली असता नवऱ्याने मारहाण करून हात मोडल्याचे तिने सांगितले. तिच्या शरीरावर मारहाणीचे वळ दिसले. ती ‘आजच्या दिवस मुक्काम कर,’ असे मला सांगत होती. मात्र, संजयने मला राहू दिले नाही म्हणून मी पुन्हा चिंचणेरला आलो. १० मार्चला रोहिणीच्या आत्महत्येचीच माहिती मला मिळाली,’ असे विजयकुमार बर्गे यांनी नमूद केले आहे. महाडिक दाम्पत्याची थोरली मुलगी शिवानी सहा वर्षांची आहे तर धाकटी गुड्डी चार वर्षांची आहे. नुकतीच ती अंगणवाडीत जाऊ लागली आहे. मंगळवारच्या थरारनाट्यानंतर या दोघी कमालीच्या भेदरल्या आहेत. घटनेनंतर रोहिणीच्या माहेरची मंडळी संतप्त झाली होती. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत अनुचित प्रकार घडू दिला नाही.
शिडीवरून पाहिले लटकते कलेवर
रोहिणीने आत्महत्या करण्यापूर्वी पती-पत्नीमध्ये मोठा वादंग झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे. रोहिणी जिन्यावरून वरच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा आतून बंद केला. संजयला संशय आला; परंतु जिन्यावरून वर जाऊन काहीच दिसू शकणार नव्हते. त्यामुळे त्याने बाहेरच्या बाजूला शिडी लावली. त्यावरून तो गॅलरीपर्यंत पोहोचला. तेथून खिडकीची काच फोडून त्याने खोलीत डोकावले असता पत्नीचे लटकणारे कलेवर त्याला दिसले. नंतर खाली उतरून त्याने मोठ्या कटरने स्वत:चा गळा चिरून घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.