विनोद शिवकुमार, श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:39 AM2021-03-27T04:39:54+5:302021-03-27T04:39:54+5:30
कऱ्हाड : मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम पाहात होत्या. त्यांनी नुकतीच ...
कऱ्हाड : मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम पाहात होत्या. त्यांनी नुकतीच स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. त्यांची ही आत्महत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून असून, संबंधित अधिकारी विनोद शिवकुमार व श्रीनिवास रेड्डी यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडे केली आहे.
भाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दीपाली चव्हाण यांची आत्महत्येची घटना घडल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाही घरात प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. दीपाली चव्हाण यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे त्रास देत होते, हे मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. पण त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी हेदेखील तेवढेच दोषी आहेत. श्रीनिवास रेड्डी यांच्या संदर्भातील काही पुरावे मी तुम्हाला सादर करू शकतो, असेही भाटे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना तत्काळ निलंबित करावे. तसेच दोघांच्याही उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी रोहन भाटे यांनी केली आहे.