महाबळेश्वराच्या टोलला स्थगिती
By Admin | Published: February 10, 2017 10:22 PM2017-02-10T22:22:00+5:302017-02-10T22:22:00+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश
सातारा : महाबळेश्वरच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रदूषणकर व प्रवासीकर वसुली ठेका मर्जीतील ठेकेदाराला मिळावा, यासाठी नगरपालिकेला वेठीस धरले होते. या टोलबाबत शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या वादग्रस्त ठेक्याला स्थगिती दिली असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर नगरपरिषदेचे प्रदूषणकर व प्रवासीकर वसुली ठेका निवडीसाठी दि. २० आॅक्टोबर २०१६ रोजी ३ वर्षांसाठी राज्यातील नामांकित ठेकेदाराकडून आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. याला पहिल्यावर्षी प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा जाहीर निविदा प्रसिद्धी केली. यावेळी साताऱ्याचे ठेकेदार चंद्रकांत जाधव (३ कोटी ८४ लाख २४ हजार ३७५), नागपूरचे ठेकेदार खळदकर कन्ट्रक्शन (३ कोटी ४१ लाख ७ हजार ५६२ ) व पुणे येथील ठेकेदार मोमीन एंटरप्रायझेस (३ कोटी ७९ लाख ६५ हजार १८०) अशा रकमेचा ठेका मिळविण्यासाठी निविदा व अनामत रक्कम भरली. त्यानंतर जाणीवपूर्वक जास्त बोली करणाऱ्या ठेकेदाराला कागदपत्राचे निमित्त साधून ठेक्यापासून वंचित ठेवले. यामुळे नगरपरिषदेचे तीन वर्षांत १ कोटी २९ लाख ५० हजार ४३९ एवढ्या रकमेचे नुकसान करणारी ठरली. याबबात करठेका वसुलीचे ठेकेदार चंद्रकांत जाधव व सलीम बागवान, सुनील साळुंखे व महाबळेश्वरच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या अन्यायग्रस्त करवसुली ठेक्याला स्थगिती देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याची चंद्रकांत जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)