नगरपंचायत इमारत बांधकामास स्थगिती
By admin | Published: March 26, 2017 12:04 AM2017-03-26T00:04:55+5:302017-03-26T00:04:55+5:30
धर्मादाय आयुक्तांचा आदेश : मलकापुरात काहीकाळ तणावाचे वातावरण; गुरव समाजातील महिलांचा बांधकामाच्या जागेवर ठिय्या
मलकापूर : येथील नगरपंचायतीने सुरू केलेल्या प्रशासकीय इमारत बांधकामास देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने स्थगिती आणली आहे. योग्य निर्णय होईपर्यंत हे बांधकाम जैसे थे ठेवण्याचा आदेश धमार्दाय आयुक्तांनी दिला आहे. हा आदेश नगरपंचायत प्रशासन व पोलिसांना सादर करून नगरपंचायत इमारत बांधकाम तत्काळ थांबवण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह गुरव समाजाच्या महिला या जागेत आल्यावर तणावाचे वातावरण झाले.
नगरपंचायत निर्मितीनंतर नगरपंचायत प्रशासनाने जागा मंजुरीनुसार प्रशासकीय इमारत व अग्निशामक युनिटसाठी ताब्यात घेण्याचे सोपस्कार केले. जमीन ताब्यात घेण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने महसूल विभागाकडे व जिल्हाधिकारी पातळीवर पूर्तता करत त्यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रस्टचे कूळ म्हणून सागर श्रीरंग शिंदे यांनी उच्च न्यायालयात नगरपंचायत प्रशासनाला आव्हान दिले होते. या सर्व पातळीवर पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दाव्याचा उच्च न्यायालयात प्रशासनाच्या बाजूने निकाल लागल्यावर नगरपंचायत प्रशासनाने १८ मार्चला जमीन ताब्यात घेऊन संरक्षक भिंतीच्या बांधकामास सुरुवात केली. त्यादिवशीही सागर शिंदे यांच्यासह काहीजणांनी बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच बांधकाम सुरू केले.
शनिवारी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मारुती व लक्ष्मीदेवी देवस्थानचे पदाधिकारी अरविंद गुरव, अशोक गुरव, मोहन गुरव, शिवाजी गुरव व कूळ सागर शिंदे यांच्यासह महिलांनी संबंधित ठेकेदारास बांधकाम थांबवण्यास सांगितले. त्यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
कामगारांनी गाशा गुंडाळला
देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांचा स्थगिती आदेश दाखवताच कंत्राटदाराने तातडीने काम थांबवण्याच्या सूचना कामगारांना दिल्या. सूचना मिळताच कामगारांनीही हातपाय धुऊन साहित्यासह आपला गाशा गुंडाळला.
सत्तेचा वापर करत नगरपंचायत प्रशासनाने मनमानी कारभार सुरू केला आहे. ही जमीन आमच्या ट्रस्टच्या मालकीची आहे. या जागेवर काहीही करताना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना कसलीही नोटीस दिलेली नाही. किंवा विश्वासातही घेतले नाही. आम्ही ट्रस्टच्या वतीने धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा स्थगिती आदेश आणला आहे. ही जमीन गुरवकीची आहे, ती आमच्या गुरव समाजालाच मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.
- अरविंद गुरव, देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी