कोयना नदीत आढळला संशयास्पद मृतदेह; घातपाताची शक्यता
By संजय पाटील | Published: February 23, 2024 08:45 PM2024-02-23T20:45:11+5:302024-02-23T20:45:48+5:30
गळ्यावर वार; कऱ्हाड पोलिसांकडून तपासाला गती
संजय पाटील, कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलाखाली नदीपात्रात सुमारे ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्यासारख्या खुणा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे कऱ्हाड शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. रात्री उशीरापर्यंत संबंधिताची ओळख पटली नव्हती.
दरम्यान, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनीही घटनास्थळास भेट देत अधिकाऱ्यांना तपासाबाबत सुचना दिल्या. संबंधिताचा घातपात झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडच्या जुन्या कोयना पुलाच्या परिसरातील नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह वाहनधारकांना दिसला. त्यामुळे पुलावर गर्दी झाली. याबाबतची माहिती नागरीकांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, अर्जुन चोरगे, अमित पवार, शशिकांत काळे, कुलदीप कोळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढत तपास सुरू केला. मृतदेहाच्या गळ्यावर वार झाल्यासारख्या खुणा दिसत असल्या तरी नेमका निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती हाती लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.