बाबांमुळे सूतगिरणी टिकली; अन्यथा आत्महत्याच..
By Admin | Published: October 26, 2015 11:04 PM2015-10-26T23:04:41+5:302015-10-27T00:25:16+5:30
अरुण गोरेंचा रणजितसिंहांना टोला : पृथ्वीराज चव्हाणांची मदत विसरणाऱ्यांनी नेहमीप्रमाणे गद्दारी केली
दहिवडी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच उरमोडी आणि जिहे-कटापूर या पाणी योजनांना भरघोस निधी मिळाला, हे सर्व जनतेला माहीत आहे. परंतु ज्यांनी केलेल्या उपकारांची कधीच जाण ठेवली नाही, ज्यांची विचारसरणी नेहमीच सूर्याजी पिसाळांसारखी गद्दारीची राहिली आहे, जे वरिष्ठांची खोटी मर्जी संपादन करून सत्तेला चिकटून राहतात, पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडतात, त्या रणजितसिंह देशमुख यांना पृथ्वीराज चव्हाण, आ. गोरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी उंचीही नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूतगिरणीला भरीव मदत केली नसती तर तुम्हाला आत्महत्या करावी लागली असती, हे विसरू नका,’ असा टोला माण बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला.दहिवडी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘दलबदलू रणजितसिंह देशमुख यांना नेहमी सत्तेबरोबर राहायची सवय आहे. त्यासाठी पक्षनिष्ठा लाथाडायला ते एका पायावर नेहमीच तयार असतात. वरिष्ठांची भाटगिरी करून मर्जी संपादन करून वैयक्तिक स्वार्थ साधण्यात ते पटाईत आहेत. अगोदर युतीची सत्ता असताना शिवसेनेबरोबर, नंतर काँग्रेसबरोबर आणि सवयीप्रमाणे आता ते पुन्हा शिवसेनेबरोबर आहेत. पालकमंत्र्यांवरील बेगडी प्रेम दाखविण्यासाठी ते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलेले उपकार सोयीस्कररीत्या विसरले आहेत. आ. चव्हाण व आ. गोरे यांनी माण-खटावच्या दुष्काळ आणि पाणी योजनांसाठी सर्वाधिक प्रयत्न केले आहेत. रणजितसिंह देशमुख त्यांच्या सूतगिरणीशेजारी येळीव तलावात साठवलेले उरमोडीचे पाणी पितात, त्यांच्या निमसोडच्या शेतात पिकणारा ऊसही उरमोडीच्या पाण्यावरचाच आहे.
स्वत:च्या गावात देशमुखांना साधी स्मशानभूमी बांधता आली नाही. गावातील सार्वजनिक रस्ते वैयक्तिक माणसांच्या नावावर आहेत. त्यांनी विकासाची व जिहे-कटापूर पाणी योजनेची वल्गना करू नये. त्यांनी जिहे कुठे आहे आणि कटापूरमध्ये काय करायचे आहे, याची माहिती घ्यावी. त्यांचे आणि विकासकामांचे कधीच जुळले नाही. त्यांना विधानसभा निवडणुकीत माण-खटावच्या जनतेने डिपॉझिट जप्त करून त्यांची जागा दाखवून दिली आहे.
अरुण गोरे पुढे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीसाठी कधीच स्टंट केला नाही. जनतेपुढे जिहे-कटापूरविषयी सत्य आणि वास्तव माहिती येण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात गैर काय? सेना-भाजपाच्या सरकारला वर्ष झाले. त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी काय केले, याचा लेखाजोखा मांडावा. साताऱ्यात एका स्टेजवर येऊन जिहे-कटापूरबाबत जनतेला माहिती देण्याची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवावी. साताऱ्याचे मेडिकल कॉलेज त्यांच्या सरकारने रद्द केले आहे. पालकमंत्र्यांनी ते रद्द होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले, हे स्पष्ट करावे.
‘‘आ. गोरेंनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना माण-खटावमध्ये वारंवार आणले, ते पिकनिकला नव्हे. त्यांनी माण-खटावला येऊनच पाचशे साखळी सिमेंट बंधारे बांधायला निधी दिला, हे देशमुखांना दिसले नाही का?’ (प्रतिनिधी)
अर्धवट ज्ञान पाजळवू नये...
देशमुख आता शिवसेनेत आहेत. त्यांनी उरमोडीसाठी आ. गोरेंनी दोन कोटींचा चुराडा केला, असा आरोप केला आहे. त्यांनी जलसंपदा विभागाकडून वास्तव माहिती घ्यावी. जो निधी खर्च झाला तो योजनेच्या कामांना पूरकच होता. त्या काळातच उरमोडीचे सर्वाधिक काम पूर्णत्वाकडे गेले होते. कोणतीही माहिती न घेता देशमुखांनी अर्धवट ज्ञान पाजळवूू नये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा माण-खटावमध्ये आले, तेव्हा न बोलविता जिवाचा आटापिटा करून हेलिपॅडवर हारतुरे घेऊन उपस्थिती दाखविण्यासाठी धडपडणाऱ्या देशमुखांनी वाचाळ बडबड बंद करावी. त्यांची अवस्था नेहमीच ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’ अशीच असते, असा टोलाही अरुण गोरेंनी शेवटी लगावला.