सातारा नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून सुवर्णा पाटील
By Admin | Published: October 27, 2016 12:08 AM2016-10-27T00:08:40+5:302016-10-27T00:15:01+5:30
‘रासप’ला तीन जागा : १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने बुधवारी रात्री १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, भाजपच्यावतीने नगरसेविका सुवर्णा पाटील यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य
दीपक पवार, दत्ताजी थोरात, सुनील काळेकर, सुवर्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दीपक पवार म्हणाले, ‘इतर मित्र पक्ष सोबत आले नाहीत तर स्वबळावर ही निवडणूक लढविली जाईल. शिवसेना व रिपाइं यांना पुढील २४ तासांची डेडलाईन दिली आहे. सातारा शहराचा विकास आणि घराणेशाहीला विरोध, असा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. साताऱ्यात घराणेशाही असल्यामुळे विकास झाला नाही. अनेक विकासकामांना नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे खीळ बसली. याला घराणेशाही कारणीभूत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घराण्यात अनेक वर्षे सत्ता आहे आणि आता त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा आहे. म्हणजे पुन्हा घराणेशाही सुरू होणार. सातारा शहराच्या नगराध्यक्षपदासाठी दुसरी सक्षम सामान्य परिवारातील महिला नाही का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘गेल्या पाच वर्षांत नागरिकांच्या पैशाने जी उधळपट्टी झाली, ती रोखण्याचा प्रयत्न आहे. सातारा विकास आघाडीमध्ये मी पाच वर्षे जरी काम केले तरी मी भाजप सदस्य म्हणूनच काम केले.’ (प्रतिनिधी)
उमेदवारांची नावे
प्रभाग १ प्रदीप मोरे, २ मिलिंद काकडे, ३ दीपक बर्गे, ५ योगेश जाधव, ७ जयश्री काळेकर, अशोक धडचिरे, ८ धीरज घाडगे, ९ विक्रम बोराटे, ११ आप्पा कोरे, १४ महेंद्र कदम, सरोज पवार, १५ सागर पावशे, १६ धनंजय जांभळे, प्राची शहाणे, १७ विजय काटवटे, सिद्धी पवार, १८ संजय लेवे व प्रभाग १९ व २० मध्ये राष्ट्रीय समाज पक्षासाठी तीन जागा देण्यात आल्या आहेत.