ऊस बिलासाठी स्वाभिमानी आक्रमक: कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:12 PM2020-09-08T15:12:46+5:302020-09-08T15:14:20+5:30
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातील सन २०१९/२० मधील गळीत हंगामातील ऊसबिल दिले नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ऊस बिल वसुली आंदोलन चालू केले. सुरुवातीला काही कारखानदारानी प्रतिसाद देत कोरोनाचे कारण सांगत मुदत मागितली संघटनेने ही मान्य केले व १० दिवसांची लेखी मुदत दिली परंतु आज १५ दिवस झाले तरी ही कारखानदारांनी टांग मारली.
साधा संपर्क सुध्दा केला नाही. आणि त्यात भरीस भर कोरोना संसर्ग सातारा जिल्ह्यात फोफावला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची दिशा बदलली आहे. शासकीय नियमाचे पालन करुन किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या सातारा येथील घरासमोरुन फक्त स्वाभिमानीचे ३ पदाधिकारी आंदोलनाला बसले आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना व कृष्णा कारखान्याने शेतकऱ्यांचे बिल दिले. मात्र, इतर कारखान्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. साताऱ्यात मदन भोसले यांच्याशी चर्चा झाली मात्र कोणताच तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ यांनी दिली.