Satara Crime: ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:07 IST2025-04-11T14:06:52+5:302025-04-11T14:07:18+5:30
सातारा : येथील पोवई नाक्यावरील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्ती बसत असल्याने कारवाईच्या मागणीसाठी गेल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...

Satara Crime: ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी
सातारा : येथील पोवई नाक्यावरील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्ती बसत असल्याने कारवाईच्या मागणीसाठी गेल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना गोळी घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजी मंडई आहे. या मंडईतील शेतकऱ्यांच्या जागेवर इतरच लोक बसतात. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारवाईची मागणी केली होती. तसेच बुधवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी गेले होते. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि पोलिसही उपस्थित होते.
यादरम्यान, शेळके यांना एकाने गोळी घालून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्याने वाद टळला. याप्रकरणी शेळके यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी घटनेला दुजोरा दिला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही स्पष्ट केले.