स्वाभिमानी लढणार ‘महायुती’तूनच
By admin | Published: August 31, 2014 12:19 AM2014-08-31T00:19:48+5:302014-08-31T00:20:00+5:30
सदाभाऊ खोत : १३ जागांची मागणी; राज्याच्या सर्व विभागांतून प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा
मलकापूर : ‘महायुती’मधील घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे़ जागावाटपावरून कोणतेही वादंग न करता आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचे निश्चित झाले आहे़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १२ ते १३ जागांची अंतिम यादी सादर केली आहे़ राज्यातील सर्व विभागात प्रतिनिधित्व मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे़,’ असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले़
मलकापूर येथील पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, देवानंद पाटील, सचिन नलवडे, दीपक पाटील, प्रदीप मोहिते, भाऊसाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती़ खोत म्हणाले, ‘महायुतीतील घटकपक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे़ सर्वांनाच संधी देणे शक्य नाही.
सर्वांचा मेळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे़. राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिळवलेल्या जागेत एकमेकांच्या हातात हात घालून जाण्याचा निर्णय घेतला आहे़ शिवसेनाबरोबरची बोलणीही अंतिम टप्प्यात आहेत़ दि. ५ सप्टेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल़ जागा वाटपानंतर मतदार संघनिहाय उमेदवारांची घोषणा ते-ते पक्ष करतील़’
काँग्रेस-राष्ट्रवादीमधून महायुतीत येणाऱ्यांची संख्या पाहता घटक पक्षांना फटका बसणार का? असे विचारले असता, ‘भाजप व शिवसेनेत ती गर्दी होत आहे़ कोणाला आत घ्यायचे, त्यापैकी कोणाला तिकीट द्यायचे, हे ज्याच्या पक्षाचा विषय आहे़ पक्षप्रमुख निर्णय घेतील़ प्रत्येक
पक्ष मिळालेल्या जागा त्यांच्या स्वत:च्याच चिन्हावर लढवणार यात कोणतीही
तडजोड नाही़ महायुतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, यांच्याच वक्तव्याला महत्त्व आहे़ बाकी कोण काय बोलते, हे महत्त्वाचे नाही़’ (प्रतिनिधी)
दुसऱ्या हप्त्याचा लढा सुरूच
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा परिजात म्हणून २०० ते २२५ रुपयांचा दुसरा हप्ता कारखान्यांनी दिला आहे़ हे संघटनेच्या आंदोलनाचे यश आहे़ शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त पाडण्यासाठी ५०० रुपये दुसरा हप्ता यावर ठाम असून, यापुढेही लढा सुरूच राहील.