स्वागत कमान वाद: लाँग मार्चमधील बेडगच्या ७ जणांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार

By दीपक शिंदे | Published: September 23, 2023 12:17 PM2023-09-23T12:17:37+5:302023-09-23T12:17:56+5:30

सांगलीचे वरिष्ठ अधिकारी साताऱ्यात, आंदोलकांच्या प्रकृतीबद्दल चाैकशी

Swagat Kaman controversy: 7 persons from Bedg in Long March treated at Satara District Hospital | स्वागत कमान वाद: लाँग मार्चमधील बेडगच्या ७ जणांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार

स्वागत कमान वाद: लाँग मार्चमधील बेडगच्या ७ जणांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार

googlenewsNext

सातारा : बेडग (ता. मिरज, जि. सांगली ) येथील ग्रामस्थांनी स्वागत कमान बांधण्यासाठी मुंबईकडे लाँग मार्च सुरू केला असून यामधील ७ जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात भेट देत आंदोलकांच्या प्रकृतीची चाैकशी केली.

बेडग येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आणि ती पुन्हा बांधण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी मुंबईला जाण्यासाठी लाँग मार्च सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथून याला सुरुवात झाली. हा लाँग मार्च पुणे-बंगळुरु महामार्गाने जात असून गुरुवारी साताऱ्यात आंदोलक आले.

त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर पाच जणांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी दाखल केले. तर, शुक्रवारी सकाळी आणखी तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील एकाला उपचारानंतर सोडण्यात आले आहे. सध्या ७ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात आंदोलकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे हे शुक्रवारीच जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी उपचार घेत असणाऱ्या आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकृतीबद्दल माहिती घेतली. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

आंदोलक उपचारानंतर पुन्हा लाँग मार्चमध्ये...

माणगावमधून सुरू झालेल्या लाँग मार्चला १२ दिवस झाले आहेत. यामध्ये एक वर्षापासून ९५ वर्षांपर्यंतचे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. त्यातील काही जण हे शाळकरी विद्यार्थीही आहेत. तर, उपचारानंतर आम्ही पुन्हा लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहोत, असे उपचार घेणाऱ्या आंदोलकांनी सांगितले.

Web Title: Swagat Kaman controversy: 7 persons from Bedg in Long March treated at Satara District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.