जिल्ह्यातील आठही जागा स्वाभिमानीने लढवाव्यात
By admin | Published: September 7, 2014 10:13 PM2014-09-07T22:13:54+5:302014-09-07T23:23:00+5:30
शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव
कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत असल्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळताना मर्यादा येत आहेत. वाट्याला येणाऱ्या मतदार संघामुळे निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे जिल्ह्यातील आठही जागा लढवाव्यात, असा ठराव संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
संघटनेच्या येथील कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील, शंकर शिंदे, धनंजय महामुलकर, संजय भगत, प्रल्हाद भुजबळ, दिलीप तुपे, जिवन शिर्के, तानाजी देशमुख, देवानंद
पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली.
लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महायुतीला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संघटनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या. त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी. कऱ्हाड दक्षिणेतुन पंजाबराव पाटील, कोरेगावमधून संजय भगत, शंकर शिंदे व फलटणमधून दिलीप तुपे यांनाच उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास वेगळा विचार करण्याचा निर्णय झाला. या ठरावाची एक प्रत खासदार राजू शेट्टी यांनाही पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)