सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाडल्या ऊसतोडी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 06:29 PM2017-11-04T18:29:18+5:302017-11-04T18:39:31+5:30
पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.
कऱ्हाड ,दि. ०४ : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.
गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊसदराबाबत आंदोलने केली आहेत. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगीही कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथून गत आठवड्यापूर्वी पडली होती. हबरवाडी येथे शुक्रवारी होत असलेली ऊस वाहतूक रोखत टॅक्टर-ट्रॉलीतील चाकांतील हवा कार्यकर्त्यांनी सोडली होती. त्यानंतर शनिवारी (दि. ४) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाठार, काले, आटके परिसरात आंदोलन केले.
कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काले परिसरातील उसतोड सुरू असलेल्या पाच फडात जाऊन तोडी बंद पाडल्या. तसेच शेतकऱ्यांना जोपर्यंत उसाचा पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये कारखान्यांकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत तोडी घेऊ नये, असे आवाहन केले.
माझ्या शेतात आज ऊसतोड सुरू होती. मात्र या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी त्यांच्या आंदोलनामागची भूमिका मला पटवून दिली. त्यावेळी मी स्वत:हूनच ऊसतोडणी बंद करायला परवानगी दिली आहे. कारखानदार उचल जाहीर करत नसल्यामुळे संघटनांना आंदोलन करावे लागत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
- शशिकांत यादव
शेतकरी, काले
उसाची पहिली उचल ३ हजार ४०० रुपये जाहीर करा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली आहे. मात्र, कारखानदार त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. उचल जाहीर न करताच अनेकांनी ऊसतोडणी सुरू केलेली आहे. आपला ऊस लवकर जावा, या भूमिकेने काही शेतकरीही बळी पडत आहेत. ही बाब चुकीची असून, शेतकऱ्यांनी स्वत:च्या हितासाठी स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, आम्ही शांत मार्गाने आंदोलन करीत आहोत. मात्र, कारखानदारांनी आडमुठेपणा सोडला नाही तर आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.
- विकास पाटील
जिल्हा प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना