चालकाचे नियंत्रण सुटले, मिठाईचे दुकान उडविले; कामगार गंभीर जखमी, सातारा बसस्थानकात अपघात

By दत्ता यादव | Published: June 1, 2024 01:07 PM2024-06-01T13:07:30+5:302024-06-01T13:10:43+5:30

आणखी दोन ठिकाणी एसटीचे अपघात

Sweet shop blown up by ST at Satara bus station, Worker seriously injured | चालकाचे नियंत्रण सुटले, मिठाईचे दुकान उडविले; कामगार गंभीर जखमी, सातारा बसस्थानकात अपघात

चालकाचे नियंत्रण सुटले, मिठाईचे दुकान उडविले; कामगार गंभीर जखमी, सातारा बसस्थानकात अपघात

सातारा: सातारा बसस्थानक आज, शनिवारी सकाळी झालेल्या अपघाताने हादरून गेले. फलाटावर बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने मिठाईचे दुकान उडविले. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाला. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कऱ्हाड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-कोल्हापूर एसटी (एमएच ०७सी ९२२३) शनिवारी सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी बसस्थानकात आली. फलाट क्रमांक १४ वर चालक एसटी उभी करत असताना अचानक एसटीचा वेग वाढला. फलाटावर असलेल्या मिठाई दुकानावर एसटी जोरदार धडकली. यात दुकानातील कामगार देविदास सोनटाके (वय ३५, रा. लातूर) याच्या पायाला गंभीर जखम झाली. फलाटावर अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. तर दुकानातील मिठाई व इतर वस्तू खाली पडल्याने मिठाई दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. 

हा अपघात झाला तेव्हा बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले होते. अपघातानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांच्या काळजात धस्स झालं. काही प्रवासी फलाटावरील बाकड्यावर बसले होते. सुदैवाने मिठाईच्या दुकानाला उडवून एसटी आतमध्ये गेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असं प्रवाशांनी सांगितले. 

या अपघातानंतर जखमी दुकानातील कर्मचाऱ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खंडाळा आणि कऱ्हाड या भागातही शनिवारी सकाळी एसटीचे दोन अपघात झाले. मात्र, त्यामध्ये किती जखमी झाले, हे अद्याप समोर आले नाही.   

Web Title: Sweet shop blown up by ST at Satara bus station, Worker seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.