नदीच्या पुरात पोहताना युवक वाहून गेला, मर्ढे येथील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:20 PM2019-08-05T14:20:26+5:302019-08-05T14:21:59+5:30
कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही.
सातारा : कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही.
धीरज तुकाराम शिंगटे (वय १९, रा. मर्ढे, ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मर्ढे येथील कृष्णा नदीच्या पुरामध्ये दहा ते बारा मित्रांसमवेत धीरज हा पोहण्यासाठी गेला होता. मर्ढे येथील पुलावरून मुले खाली उड्या टाकत होती. त्यावेळी धीरजनेही पुरामध्ये उडी घेतली. इतर मुलेही त्याच्या पाठोपाठ नदीत उड्या घेत होती.
पोहत असताना अचानक धीरजला दम लागला. त्यामुळे तो पुराच्या पाण्यात गटांगळ्या घेऊ लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या आधीच तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. या घटनेची माहिती मर्ढे गावात मिळताच नदीकाठी ग्रामस्थांसह महिलांनीही गर्दी केली होती.
कृष्णा नदीच्या काठावरून लिंब, गोवे, वनगळ या परिसरामध्ये ग्रामस्थ आणि पोलिसांनीही त्याचा शोध घेतला. मात्र, तो अखेर सापडलाच नाही. रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली.