आजीबार्इंच्या बटव्यात ‘स्वाईन फ्लू’चा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:08 PM2017-08-20T23:08:27+5:302017-08-20T23:08:27+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे भर दिला आहे.
स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने डुकराद्वारे होतो. संसर्गजन्य आजार असल्याने तो एका व्यक्तीला झाल्यास दुसºया व्यक्तीला होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम व त्याची थुंकी यांमधून होतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने थैमान घातले असून, आजपर्यंत अनेक रुग्ण दगावले आहेत. सातारा जिल्ह्यातही हळूहळू हा आजार डोके वर काढू लागला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील जावळी, कोरेगाव, कºहाड व सातारा तालुक्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले आहेत.
स्वाईन फ्लूची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत. आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जात असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. एकीकडे आरोग्य विभाग हा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क झाला आहे.
काही घरगुती उपाय
तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा
समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.
हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत. गर्दीत जाणे टाळावे.
खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.
पौष्टिक आहार घ्यावा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे.
आहारात पातळ पदार्थ घ्यावेत. तोंडावर मास्क लावावा.