शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर तलवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:47+5:302021-01-17T04:34:47+5:30
म्हसवड : काळचौंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी येथील सहा जणांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुका प्रमुखांवर तलवार व काठ्यांनी हल्ला ...
म्हसवड : काळचौंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी येथील सहा जणांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुका प्रमुखांवर तलवार व काठ्यांनी हल्ला केला. ही घटना घडल्यानंतर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर माण-खटावचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी सुमारे एक तास पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हल्ल्याची तक्रार घेण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब महंमद मुलाणी व उपतालुका प्रमुख शिवदास महादेव केवटे हे शुक्रवार, दि. १५ रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता काळचौंडी हद्दीत काळचौंडी चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सुमारे दोनशे मीटर अंतरावर मतदानाविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते. त्या ठिकाणी तलवारी व काठ्या हातात घेऊन विशाल बाळासाहेब माने, विलास काशिनाथ माने, सचिन काशिनाथ माने, स्वप्निल सचिन माने, ऋषिकेश बाळासाहेब माने, विष्णू आबाजी माने हे सहा जण आले व त्यांनी ‘तू इथे कशाला आलास, याला कापून टाकू या’, असे म्हणून दोघांवर हल्ला केला. तसेच झालेल्या झटापटीत मुलाणी यांच्या खिशातील पाच हजार तीनशे रुपये कोणीतरी काढून घेतले आहेत. घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी सात ते रात्री अकरापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी थांबलो असतानाही पोलीस अधिकारी तक्रार घेण्यास तयार नव्हते.
ही माहिती जिल्हाप्रमुख व वरिष्ठांना कळविल्यानंतर शनिवारी माण-खटावचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा पोलीस अधिकारी बाजीराव ढेकळे तक्रार घेण्यास तयार नसल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनसमोर भरउन्हात ठिय्या मांडल्यानंतर घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, संघटक रामभाऊ जगदाळे, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील यांनी भेट दिली. शहरप्रमुख राहुल मंगरुळे, सुशांत पार्लेकर, उपतालुकाप्रमुख अंबादास शिंदे, बाळासाहेब जाधव, युवासेना तालुकाध्यक्ष कृष्णराज आवळे-पाटील, अंबादास नरळे, अमित कुलकर्णी, सोमनाथ कवी, किशोर गोडसे, समीर जाधव, ए. के. नामदास, उपशहरप्रमुख आनंद बाबर, शाखाप्रमुख सतीश वीरकर, प्रीतम तिवाटणे, सिद्धनाथ कवी, सोनू मदने उपस्थित होते.
प्रतिक्रिया - चंद्रकांत जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना - सत्तेतल्या पक्षावर ही वेळ तर बाकीच्यांचे, सर्वसामान्यांचे तर विषयच सोडा. तक्रार घ्यायची सोडा तक्रारदारालाच शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या मगरुर पोलीस अधिकाऱ्याची ताबडतोब बदली झाली पाहिजे; अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.