तिच्या हाती मोबाईलऐवजी तलवार...तलवारबाजीत राज्यात उमठविला कर्तृत्वाचा ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:47 AM2019-11-10T00:47:03+5:302019-11-10T01:15:26+5:30
आई रोहिणी घरातील जबाबदारी सांभाळत असताना ब्युटी पार्लरचा व्यवसायाची समर्थपणे सांभाळत आहे. ते दोघेही वैष्णवीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे.
पांडुरंग भिलारे ।
वाई : नववी, दहावीची मुलं कायमच मोबाईलमध्ये डोकं घालून तासन्तास गेम खेळत असतात. त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी फरकच पडत नाही. पण याला वाई तालुक्यातील दरेवाडीतील वैष्णवी यादव अपवाद ठरली. तिनं हाती तलवार घेऊन राज्यात तलवारबाजीत चमकदार कर्तृत्व सिद्ध केलं आहे.
दरेवाडी गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. हे खरेतर खेडे गाव येथील मुलांना शिक्षणासाठी वाई येथे यावे लागते. वैष्णवी गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. वैष्णवी हिने साहसी क्रीडा प्रकारात चमकण्याचा निर्धार केला. यासाठी वैष्णवीने अथक परिश्रम घेत आहे. दहावीत शिकत असताना शाळा, शाळेचा अभ्यास, क्लब व खेळाचे प्रशिक्षण या सर्वाची उत्तम प्रकारे सांगड घालून नियोजन करते. वैष्णवी पहिल्यापासूनच धाडसी आहे, जिद्दी आहे. तिचे वडील शरद यादव हे शाहीर व खेळाडू असून, प्राथमिक शिक्षक आहे.
आई रोहिणी घरातील जबाबदारी सांभाळत असताना ब्युटी पार्लरचा व्यवसायाची समर्थपणे सांभाळत आहे. ते दोघेही वैष्णवीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. त्यांच्याकडून प्रेरणा मार्गदर्शन यांच्या जोरावर वैष्णवीने राज्यस्तरापर्यंत झेप घेतली़ क्रीडा प्रबोधिनीत वैष्णवी तलवारबाजीचे धडे गिरवत आहे. त्यातून अनेक पारितोषिके मिळविले आहेत.
तलवारबाजी बरोबर ज्युदोचीही दिली जोड..
राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत वैष्णवी यादव हिने प्रथम कोल्हापूर विभागात यश मिळवले. त्यानंतर लातूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरावर यश संपादन केले. तसेच नांदेड येथे झालेल्या सत्ताविसाव्या राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेतही वैष्णवीने चमकदार कामगिरी करून नामांकन प्राप्त केले़ याचबरोबर ज्युडोमध्ये ही तिने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे़ तलवारबाजीत आवश्यक असलेल्या चपळतेचा फायदा तिला ज्युदोमध्येही होतो. तिच्या या कामगिरीमुळे मुलींना प्रेरणा मिळत आहे़
तलवारबाजी करत असताना अनेक वेळा इजा होत असते़ पण याला वैष्णवी कधीही घाबरलेली नाही. वैष्णवी ही खूप जिद्दी व मेहनती आहे़. खेळात यशस्वी होत असली तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही.
- प्रफुल्ल जगताप, प्रशिक्षक.
राष्ट्रीय पंच सुधीर जमदाडे यांचे खेळ निवडण्यासाठी मार्गदर्शन झाले. राज्यपंच विकास लोखंडे व एनआयसी कोच प्रफुल्ल जगताप यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता राष्ट्रीयस्तरावर जाण्याचा संकल्प आहे.
- वैष्णवी यादव, खेळाडू